घरमहाराष्ट्रफडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न - अतुल लोंढे

फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न – अतुल लोंढे

Subscribe

फडणवीसजी, स्वप्नातून बाहेर या आणि वास्तव स्वीकारा - अतुल लोंढे

भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

‘मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे’, असे फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले, तो धागा पकडून अतुल लोंढे पुढे म्हणाले की, फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही. सत्ता हातातून जात आहे असे दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करुन पाहिला पण त्यांचे ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरले. त्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’, असा घोषा लावत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही. मविआचे सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसतो. त्यांनी स्वप्नातून बाहेर पडावे आणि आपण सध्या मुख्यमंत्री नाही तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहोत हे वास्तव स्विकारले पाहिजे.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षात कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही लोंढे यांनी लगावली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -