राज ठाकरेंच्या सभेचं भवितव्य औरंगाबादचे पोलीस आयुक्त ठरवणार

राज ठाकरेंना सभेला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय औरंगाबादचे पोलीस आयुक्त घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

eknath shinde letter mla security dilip walse patil reply cm uddhav thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, अद्याप या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक संघटनांनी, राजकीय पक्षांनी परवानगी देऊ नका म्हणून पोलीस आयुक्तांना दिले आहे. अशात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय औरंगाबादचे पोलीस आयुक्त ठरवणार, असे सांगितले.

राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव

मुंबईत एखाद्या ठिकाणी काही घटना घडली म्हणून संपूर्ण शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, असा निष्कर्ष काढणे उचित नाही. भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे. या सगळ्या प्रकरणांचा मूळ हेतू तोच आहे, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

विरोधकांकडून जाणीवपूर्वक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रय़त्न केले जात आहे. त्रिपुरात काही घडले की त्यावरून महाराष्ट्रात दंगल घडवायची. भोंग्यांच्या विषयावरुन समाजात अस्वस्थता निर्माण करायची, असे प्रकार भाजपकडून सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

आमदार रवि राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा धरलेला आग्रह आणि त्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वळसे पाटील यांनी आज भाजप आणि राणा दाम्पत्याला चांगलेच सुनावले.

हनुमान चालीसा कोणाला वाचायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरी वाचावी, अमरावतीच्या घरी वाचावी, मुंबईतील किंवा दिल्लीतील घरी वाचावी. याच ठिकाणी जाऊन वाचायची हा हट्ट कशासाठी? करोना काळात मंदिर बंद होती. तेव्हा मंदिरं सुरू करा आणि त्यावरून आरत्या, महाआरत्या झाल्या. असे वेगवेगळे प्रकार करून विरोधी पक्षाच्यावतीने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही, असे दाखवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे.पण ते इतके सोपे नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे, असे वळसे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

राणा दाम्पत्य हे पुढे केलेले प्यादं

जबाबदार लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करायला पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून काम करत असताना, आपल्यामुळे कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही. कुठल्याही प्रकारचा क्षोभ वाढणार नाही, तेढ वाढणार नाही, अशाप्रकारची त्यांची वर्तवणूक असायला पाहिजे. परंतु, आज विनाकारण पब्लिसिटी करण्यासाठी राणा दाम्पत्य हे पुढे केलेले प्यादं आहे. त्यांची एवढी हिंमत आहे असे नाही. परंतु, असे काही प्रश्न काढून त्यातून सरकारची, राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, हे एक जाणीवपूर्वक आखलेले षडयंत्र असून राणा दाम्पत्य हा त्याचाच हा एक भाग आहे, असा आरोप वळसे पाटील यांनी केला.