घरमहाराष्ट्रसंभाजीनगरवरून सरकारमध्ये कुरबुरी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ठाम विरोधामुळे शिवसेनेची कोंडी

संभाजीनगरवरून सरकारमध्ये कुरबुरी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ठाम विरोधामुळे शिवसेनेची कोंडी

Subscribe

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यास राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. मात्र, तरीही राज्याच्या माहिती-जनसंपर्क महासंचालनालयाकडून (डीजीआयपीआर) औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तर महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर काम करते. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून या विषयावर मार्ग काढू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, असे बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतराच्या विषयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद नाही, असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी स्वतःही माहिती महासंचालनालयाची ही बातमी वाचली आहे. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर कार्यरत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून या विषयावर मार्ग काढणार असल्याचे अजितदादा यांनी स्पष्ट केले. औरंगाबादसोबतच अहमदनगर, पुणे यांच्या नामकरणाची मागणीही पुढे येत आहे. त्यामुळे कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात ठोस भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. नामांतराबाबत भाजपसह आता मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने संभाजीनगर असे नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावे, असे आव्हान देण्यात आले. याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. मी औरंगाबादला जाणार आहे. तेथील विकासकामांचा आढावा घेणार आहे. भाजपला नामांतराबाबत बोलण्याचा अधिकार नाही. पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काही केले नाही, असे आदित्य ठाकरे मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -