उद्यापासून रिक्षा, टॅक्सीचे मीटर सुरु; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होणार

AutoRickshaw in Mumbai
प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा व टॅक्सी मीटर शुक्रवार पासून पुन्हा सुरु होत आहे. अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात परिवहन विभागाने अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांसाठी रिक्षा व टॅक्सींना परवानगी दिल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रामधील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक रुग्णांची संख्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये खास करुन मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईची लाइफलाइन २२ मार्चपासून बंद केली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात परिवहन विभागाने अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांसाठी रिक्षा व टॅक्सींना परवानगी दिल्याची माहिती दिली आहे. मात्र त्यात अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा देताना वाहतूक विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडून टॅक्सी व रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलू नये, अशी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची मागणी आहे. कारण कुठला प्रवाशी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी जात आहे, याची तपासणी चालक करूच शकत नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या प्रवाशांचा भुर्दंड चालकांना सहन करावा लागू नये. बहुतेक रिक्षा व टॅक्सी चालक शुक्रवारपासून सेवेत हजर होतील, असे आवाहन संघटनेने केले आहे.

याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करणार नसल्याचे सांगत चालकांना मोठा दिलासा दिला आहे.

प्रवाशांवर होणार कारवाई

विनाकारण टॅक्सी व रिक्षातून फिरणाऱ्या प्रवाशांवर लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांनी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी निर्धास्तपणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे. दरम्यान, रिक्षामध्ये चालक अधिक एक प्रवासी असे एकूण दोन जण, तर टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन प्रवासी असे एकूण तीन जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.