घरमहाराष्ट्रकायदे मोडूनच अवनीला मारलं; अहवाल सादर

कायदे मोडूनच अवनीला मारलं; अहवाल सादर

Subscribe

अवनी वाघिणीला वनविभागच्या शिकाऱ्यांनी कायदे मोडूनच मारल्याचा दावा व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या समितीन आपल्या अहवालात केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका घेतं, त्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून राज्यात अवनी वाघिणीच्या मृत्यूची चर्चा होत आहे. अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता या प्रकरणाला कलाटणी देणारा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे. अवनी वाघिणीला मारताना एकूण ३ कायद्यांचं उल्लंघन झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अवनीला गोळी मारणारे शिकारी शआफत अली खान आणि त्यांचा मुलगा असगर अली खान यांनी केलेले दावे खोटे ठरतायत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर या अहवालावर सरकार काय भूमिका घेतं, यावर पुढील घडामोडी आता अवलंबून असणार आहेत.

काय म्हटलंय अहवालात?

अवनीला मारताना शिकारी असगर अली खान यांनी ३ वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांचं उल्लंघन केल्याचं व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय शस्त्रास्त्र कायदा (Indian Arms Act) 1958च्या कलम ३(१), इंडियन व्हेटरनरी कौन्सिल अॅक्ट १९८४ आणि वन्यजीव (रक्षक) कायदा १९७२चं उल्लंघन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या स्टॅण्डर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर अर्थात एसओपी (SOP)चं देखील उल्लंघन झाल्याचं अहवालात स्पष्ट केलं आहे. प्राधिकरणाच्या २ सदस्यीय समितीने हा अहवाल आज गुरुवारी सादर केला. अवनीला मारण्यासाठीच्या डार्टमध्ये अनेक दिवसांपूर्वीचं औषध होतं. तसेच, त्यावेळी अधिकारी देखील तिथे उपस्थित नव्हते, असा दावा देखील अहवालामध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय अवनीला ज्या बंदुकीने गोळी मारली, ती असगर अली यांच्या मालकीची असून शआफत अली खान यांनी ती वापरल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. अवनीच्या मृत्यूनंतर व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती केली होती.

- Advertisement -

अवनीच्या मृत्यूवरून मोठा वाद

३ नोव्हेंबरला अवनी वाघिणीला यवतमाळच्या जंगलांमध्ये गोळी घालून मारण्यात आलं होतं. त्याआधी टी-१ अर्थात अवनी वाघिणीने तब्बल १३ लोकांचा जीव घेतला होता. अवनी वाघीण नरभक्षक झाल्याचं देखील वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी अवनी वाघिणीला मारल्यानंतर वन्यप्रेमींनी वनविभागावर, शिकाऱ्यांवर आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ‘अवनीने उलट हल्ला केल्यामुळे तिला गोळी घालावी लागली’, असा दावा वनविभागाकडून करण्यात आला होता.


हेही वाचा – राम कदम, अवनी वाघीण आणि फोन नंबर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -