ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मराठी माणसांवर हल्ले होणे, मराठी माणसांना एखाद्या सोसायटीत घर नाकारण्यात येणे, उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण होणे, यांसारख्या घटना घडत आहेत. अशातच आता मुंब्रा येथे एका मराठी तरुणाला मराठी बोलण्याची सक्ती करतो म्हणून कान पकडून माफी मागायला लावण्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्याला गेलेल्या मराठी तरुणाला पोलिसांनी चार तासल बसवून ठेवले. ज्यानंतर यासाठी मदत मागण्याकरिता तरुणाने मनसेकडे धाव घेतली आहे. तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. (Avinash Jadhav on Mumbra Marathi Boy in Mumbra incident runs to MNS for help)
मुंब्रा येथील एका फळविक्रेत्याला मराठी बोलण्याची सक्ती करणाऱ्या तरुणाने माफी मागितल्याची घटना गुरुवारी (ता. 02 जानेवारी) घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये मराठी तरुण कान पकडून माफी मागताना पाहायला मिळत आहे. पण या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी हा तरुण जेव्हा पोलीस ठाण्यात गेला, तेव्हा त्याला पोलिसांनी चार तास बसवून ठेवले, इतकेच नाही तर त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या आईला सुद्धा पोलिसांनी बसवून ठेवल्याचे तरुणाने प्रसार माध्यमांना सांगितले. मात्र, पुढे जाऊन काही बरे वाईट होऊ नये, याकरिता या तरुणाने मनसेकडे मदतीची मागणी केली आहे. या तरुणाने शुक्रवारी (ता. 03 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव सुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा… Marathi : मराठी बोलण्याची सक्ती केल्याने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली; कुठे घडले हे
प्रसार माध्यमांसमोर मराठी तरुणाने म्हटले की, त्या विक्रेत्यांकडून मला शिवी घालण्यात आली म्हणून मी त्यांना शिवी देऊ नका, असे सांगितले. पण त्यांनी तू माफी माग असे म्हटले. म्हणून मी तिथे माफी मागितली. पण जेव्हा मी पोलीस ठाण्यात गेलो. तेव्हा तिथे मला चार तास बसवून ठेवले. पण जेव्हा तासाभरानंतर माझी आई तिथे आली, तर तिला तीन तास पोलीस ठाण्याबाहेर बसवून ठेवण्यात आले. त्यावेळी आई रडत होती. तेव्हा त्या तरुणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण या घटनेमुळे माझी आई घाबरली आहे. अद्याप तरी मला धमकी वगैरे आलेली नाही. पण घटनेवेळी त्यांनी धमकी दिली होती. ज्यामुळे मलाही भीती वाटत आहे. तर या घटनेत पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे की नाही, याबाबतची कोणतीही माहिती नाही, असेही या तरुणाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
या प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाग साधला. तेव्हा ते म्हणाले की, मला वाटते आहे की गेल्या काही दिवसांपासून मराठी माणसाच्याबाबत अपमानास्पद गोष्टी घडू लागल्या आहेत. मुंब्रातील गुरुवारची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे. हा मराठी मुलगा आपल्या बहिणीसाठी औषधे आणायला गेला होता. त्यानंतर तिथे त्याने एका फळविक्रेत्याला फळाचे भाव विचारले. पण जेव्हा त्या फळविक्रेत्याने 100 रुपये किलो असे म्हटले, तेव्हा 50 रुपयांत देणार का? असे या तरुणाने मराठीमध्ये विचारले. पण तो हिंदीमध्ये उत्तर देत होता, ज्यामुळे महाराष्ट्रात राहतोस तर मराठीमध्ये बोल, असे या तरुणाने म्हटले. ज्यानंतर हा वाद सुरू झाला. पण यानंतर तिथे काही मुसलमान मुलं गोळा झाली. साधारणतः 100-150 लोकांचा मॉप जमला, अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
तर, महाराष्ट्रात राहून या लोकांची मराठी बोलणार नाही, असे सांगण्याची आणि त्याचा व्हिडीओ तयार करण्याची हिंमत कशी काय होते. व्हिडीओ काढून व्हायरल सुद्धा तेच लोक करतात. त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्रात जर का घडत राहिले तर मराठी माणसाचे अस्तित्व हे विकोपाला येईल. कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाणे, विरारमध्ये घडलेली घटना किंवा मुंबईत घडलेली घटना, या सर्व घटना पाहिल्या तर सत्ता परिवर्तन झाल्यानंतर इतर भाषिकांमधील हिंमत मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंब्रातील घटनेनंतर या तरुणावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तरुणाला पोलीस स्टेशनला नेले. पण तेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान तरुणांनी जमून घोषणाबाजी केली. त्यामुळे आता या घटनेनंतर भविष्यात भाषिक वाद जर का झाला तर कोणालाही आश्चर्य वाटण्याची गरज नाही. पण गेल्या काही दिवसातील घटना पाहता भविष्यात महाराष्ट्रात या घटनांमध्ये वाढ होईल, असे विधान मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.