धुळे : कॉटन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं ‘पांढरं सोनं’ दिवाळी सण जवळ येत असतानाही घरातच पडून आहे. वर्ष उलटले तरीही कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कापसाला भाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. (Awaiting price hikes even as the year passes Farmers white gold lying at home Diwali in darkness…)
मागील वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला योग्य भाव मिळेल या आशेवर रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेला कापूस घरात साठवून ठेवला होता. वर्षभर त्या कापसाची निगा राखत असताना आज भाव वाढतील उद्या वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे वर्ष उलटले तरी भाववाढीचे कुठलेच चिन्ह दिसत नाही. आता नवीन कापूस वेचणीला सुरुवात झालेली असतानाही कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाते की काय अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.
हेही वाचा : ANANDACHA SHIDHA : सुषमा अंधारेंनी 30-40 ग्रॅमचा मागितला हिशोब; कंत्राटदाराच्या चौकशीची मागणी
कापसाला मिळतोय जेमतेम भाव
धुळे जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसीची लागवड करतात. यंदाही तब्बल धुळे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र, कापसाला फक्त सात हजार रुपये क्विंटल एवढाच भाव मिळत असल्याने शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे, मात्र अद्यापही कापूस घरातच पडून असल्याने सण साजरा करायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
हेही वाचा : ‘त्या’ वक्तव्यामुळे नितीश कुमार यांना ऐकावे लागले नको ते शब्द; माफीनामा, तरीही विरोधक आक्रमक
लाल्याच्या प्रादुर्भावातून जपलेली कपाशी
धुळे जिल्ह्यात बहुंताश हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्याचे क्षेत्रफळ तब्बल अडीच लाख हेक्टर एवढे आहे. या कपाशीवर यंदा अवर्षणाच्या संकाटासह वातावरणातील बदलामुळे झालेल्या विविध रोगराईच्या आक्रमणाने शेतकऱ्यांच्या कपाशीचे उत्पादन घटले आहे. अशातच आहे त्या कापसाला अद्यापही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. सध्या कपाशीला 7 हजार प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असून, जास्तीत जास्त 10 हजाराहून अधिक दर देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.