(Awhad about bogus voting) मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. अशातच धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. (Jitendra Awhad targets Mahayuti by sharing a video)
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विरोधकांनी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेटही घेतली होती. तथापि, धनंजय मुंडे यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने सध्या तरी मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
परळी मतदार संघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गैंग करायची
सगळे एकदम ट्रांसपेरेंट पोलिसांसमोर
असे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख ह्यांनी सांगितले
वीडियो आहेत काही ठिकाणचे
कोण काय करणार… https://t.co/7BqoAUkXGw— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2025
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयाबद्दलच आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 1 लाख 40 हजार 224 मतांनी मुंडे विजयी झाले आहेत. तर, ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘गजाभाऊ’ या नावाने केलेली पोस्ट शेअर करत एनसीपी एसपीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आल्याचा दावा केला आहे.
बोटावर शाई लावायची आणि मतदाराने बाहेर जायचे, मतदान केंद्राच्या आतमध्ये बटन दाबण्याचे काम एक गँग करायची. सगळे एकदम पोलिसांसमोर ‘पारदर्शीपणे’ होत असल्याचे परळीतील एनसीपी एसपीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले. काही ठिकाणचे व्हिडीओ आहेत. पण कोण काय करणार? हे कायद्याचे राज्य आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.
करुणा मुंडे यांची याचिका
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी या याचिकेत केला आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनेक प्रकारची माहिती दडवल्याचा दावा करतानाच मतदान केंद्रे ताब्यात घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. करुणा मुंडे यांचा दावा आहे की, त्यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे. (Awhad about bogus voting: Jitendra Awhad targets Mahayuti by sharing a video)
हेही वाचा – Depreciation of Rupee : अक्षय कुमार, जुही चावला, अनुपम खेर हे मोदींचे अंधभक्त, ठाकरे गटाचा निशाणा