पुणे : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. मात्र याचदरम्यान महायुतीला बहुमत मिळाले असले तरी ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. एकीकडे राज्यात ईव्हीएमविरोधात रान पेटत असताना दुसरीकडे पुण्यामध्ये समाजसेवक बाबा आढाव यांनी या सर्व प्रकाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन केले आहे. या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जो पैसा वापरण्यात आला तो सरकारी तिजोरीमधून वाटप झाल्याचा आरोप यावेळी आढाव यांनी केला आहे. (Social Worker Baba Adhav attacked the government.)
हेही वाचा : Hashtag Tadaiv Lagnam Movie : ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील ‘नकारघंटा’ हे गाणं प्रदर्शित
तसेच ईव्हीएमच्या घोटाळ्यावर बाबा आढाव यांनी घाणाघात केला आहे. ईव्हीएमचे निराकरण झालेच पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका. तसेच माझ्यासारखी माणसे मरण पत्करतील पण दाबले जाणार नाही. आम्हाला हे स्वातंत्र्य असेच नाही मिळाले, असेही ते म्हणाले आहेत. आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. दोन तीन प्रश्न आहेत. त्याचं निराकरण करा. लोकसभा आणि विधानसभेतील मतदान आणि निकालात इतकी तफावत कशी आहे, याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी आढावांनी केली आहे.
हेही वाचा : Baba Adhav : बाबा आढाव कोण आहेत? त्यांचं आत्मक्लेश आंदोलन कशासाठी सुरू आहे?
बाबा आढाव यांनी 28 नोव्हेंबरपासून उपोषण सुरु केले होते. त्यांचा उपोषणाच्या आजचा तिसरा दिवस असून त्यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. तसेच शनिवारी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपोषणस्थळी आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यावर बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.
Edited By Komal Pawar Govalkar