कुख्यात गुंड बाबा शेख खूनप्रकरण : पिस्तूल पुरवणारा फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Criminal Baba Shaikh Nashik
Criminal Baba Shaikh Nashik

कुख्यात गुंड बाबा शेख खूनप्रकरणात पिस्तूल पुरवणारा व एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस रविवारी (दि.26) पोलिसांनी सापळा रचून साकोरी (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथून अटक केली. सागर चंद्रकांत अहिरे (वय 29, रा. अरिंगळे मळा, एकलहरे रोड, नाशिकरोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

डझनभर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार बाबा शेखचा २० सप्टेंबर २०२० रोजी टोळीयुद्धातून नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगरमध्ये दोन जणांनी पाठीत पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. बाबा शेखने मृत्यूपूर्वी दोन संशयितांची नावे घेतल्यामुळे पोलिसांना तपासाला दिशा मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र, पिस्तूल पुरवणारा संशयित आरोपी सागर अहिरे फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक माणिक गायकर, पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ, पोलीस नाईक संजय गामणे, संदीप पवार, पोलीस शिपाई सचिन आजबे, मिलिंद बागूल यांना खूनप्रकरणीतील आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाआधारे ठावठिकाणा समजला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सागर अहिरे यास साकोरी येथून ताब्यात घेतले. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

बाबा शेख खूनप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी केला आहे. न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले आहे.