मुंबई : माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( अजितदादा पवार ) बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक दावा केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी हत्येपूर्वी भाजप नेते, मोहित कंबोज यांच्याशी संवाद साधला होता. त्यासह बाबा सिद्दीकी यांनी कंबोज यांचे नाव डायरीत लिहून ठेवले होते, असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यासह काही बिल्डर्सची नावे सुद्धा झिशान सिद्दीकींनी घेतली आहे.
पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकी यांनी वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ( एसआरए ) प्रकल्पामुळे झाल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बाबा सिद्दीकी यांची हत्या अभिनेते सलमान खानशी असलेल्या सलगीमुळे गॅगस्टर अनमोल बिश्नोईने केल्याचं म्हटले आहे. परंतु, झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबामुळे बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचा : पुण्यात राऊतांसमोर माजी आमदार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, नाराजीचं कारण अंधारे की…
24 ऑक्टोबरला पोलिसांनी झिशान सिद्दीकींचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. त्यात झिशान सिद्दीकींनी म्हटलं की, “वांद्रे पूर्ण आणि पश्चिम येथील ‘एसआरए’ प्रकल्पासाठी मी लढा देत होतो. बिल्डर्स अन्याय करत असल्याने अनेक नागरिक माझ्याशी संपर्क साधत होते.”
“अनेक बिल्डर्स, त्यात प्रिथी चव्हाण, शाहिद बालवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका, परवेज लखडावला, मुंद्रा बिल्डर्स, विनय ठक्कर, ओकांर बिल्डर्स आणि भाजपचे नेते मोहित कंबोज हे रोज माझ्या वडिलांच्या संपर्कात होते,” असं झिशान सिद्दीकींनी जबाबात सांगितले आहे.
बाबा सिद्दीकी हे रोजनिशी डायरी लिहायचे. 12 ऑक्टोबर 2024 ला सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या होण्याच्या काही तासांपूर्वी लिहिलेल्या डायरीत बाबा सिद्दीकी यांनी मोहित कंबोज यांचा उल्लेख केला होता.
झिशान सिद्दीकींनी म्हटलं की, “मला कळले की कंबोज यांनी 12 ऑक्टोबरला 5.30 ते 6.00 च्या दरम्यान माझ्या वडिलांशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधला होता. वांद्रे पूर्वमधील मुंद्रा बिल्डर्स आणि माझ्या वडिलांशी भेट घालून देण्याचा प्रयत्न कंबोज करत होते. याच मुंद्रा बिल्डर्सने झोपडपट्टीवासीयांशी संवाद साधताना माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले होते. याचे व्हिडिओ मला मिळाले होते.”
हेही वाचा : …तर फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील; चंद्रकांतदादांनी स्पष्टच बोलून टाकलं