नाशिक : शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित असल्याचं गृहीत धरून काही दिवसांपासून तयारी करणारे ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीतून उमेदवार राहणार असल्याच्या चर्चेमुळे घोलप हे नाराज होते. त्यातच शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्यानं घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला. आता याबाबत बोलताना ठाकरे गटाचे, खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली की, बबन घोलप यांच्याशी आज उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. (Baban Gholap resigns as Deputy Leader Discussion with Uddhav Thackeray today Sanjay Raut informed )
संजय राऊत म्हणाले की, बबन घोलप हे आमदार, मंत्री राहिलेले आहेत. आता उपनेते म्हणून काम करतात. तसंच, ते नाशिकमधले उबाठाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सर्वत्र येत आहेत. होय, त्यांनी त्या प्रकारचं पत्र नक्कीच पाठवलं आहे. शेवटी हा निकाल, निर्णय घेण्याचा अधिकार हा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. असं त्यांनी सांगितलं.
राऊत म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी त्यांना शिर्डीतून लोकसभा उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचाराला सुरूवातही केली होती. परंतु त्यानंतर काही कायदेशीर अडचणी सुरू झाल्या. त्यांच्यावर खटले उभे राहिले आणि त्यासंदर्भात निकालही लागले. त्यामुळे त्यंना त्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. आता यावेळी देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं होतं की शिर्डीतून तुम्हाला उमेदवारी देऊ. परंतु आता घोलप यांना काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत. तर त्यावर घोलप यांच्याशी उद्धव ठाकरे आज चर्चा करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.
(हेही वाचा: ढोंगीपणाचीही सीमा असते… ‘भारत’ नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा )
वाकचौरेंच्या उमेदवारीची चर्चा आणि घोलप यांची नाराजी
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी जुन्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्यानं बबनराव घोलप अस्वस्थ होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. उद्धव ठाकरें यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नारीजीही व्यक्त केली होती. तर वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला त्यांनी विरोधही केला होता.