“आमची लायकी नाही…” म्हणत बच्चू कडूंनी शिंदेंना लगावला टोला

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अपक्ष आमदारांमधील बच्चू कडू हे पहिले आमदार होते ज्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारामध्ये त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण तसे काही घडले काही न घडल्याने बच्चू कडूंनी उघडपणे नाराजी दर्शविली होती.

बच्चू कडू यांचा मागील महिन्यात अपघात झाला होता. या अपघातातून बरे होऊन बच्चू कडू पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानावर परतले आहेत. बच्चू कडू हे पहिले अपक्ष आमदार होते, ज्यांनी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला होता. राज्यात राजकीय भूकंप घडण्याआधी बच्चू कडू यांनी येणारे सरकार हे छोट्या पक्षांचे असेल, असे म्हटले होते. ज्यानंतर हे सर्व काही बच्चू कडू यांनी केले असे बोलण्यात येत होते, असे बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. पण मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना बच्चू कडू यांनी असे काही वक्तव्य केले आहे की, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू म्हणाले की, ‘जर का मी महाविकास आघाडीचे सरकार पाडले असते तर पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात नसतो का? असा प्रश्न करत आमची लायकी नसल्याने मंत्रिमंडळात घेतले नसेल,’ असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. ज्यामुळे आजही बच्चू कडू हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – अमरावतीतही भाजपाला धक्का! मविआचे धीरज लिंगाडेंचा दणदणीत विजय

दरम्यान, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकसुद्धा केले आहे. ते म्हणाले की, ‘शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर जनतेत एक सहानुभूती आहे. ही आज देखील कायम आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामात देखील दम असून, ते रात्री २ वाजता देखील सामान्य व्यक्तीसाठी उपलब्ध असतात, अशी आपुलकी पाहिजे.’

तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ठिक होते. पण शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हावर आणि शिवसेनेवर दावा टाळायला पाहिजे होता. स्वत: शिंदेंनी हे म्हटले होते. मात्र काहीही झाले तरी सत्ता पाहिजे असा राजकारणी लोकांचा धर्म झाला आहे. असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात दिव्यांग मंत्रालय झाले. जर उद्धव ठाकरे असते तर हे झालं नसतं. या मंत्रालयाचा मंत्री केले तरी तळागळात जाऊन सेवा करता येईल, असेही बच्चू कडू यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.