मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार – राज्यमंत्री बच्चू कडू

राज्यात राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू असून संध्याकाळपर्यंत निकाल हाती येणार आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाराज असलेले मंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराजी असल्याची चर्चा जोरदार पद्धतीने रंगत होती. मात्र, बच्चू कडू यांनी आज मतदान करून विधान भवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

…शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला

मतदान करण्यासाठी मी सर्वात शेवटी आलो आहे. पाच मिनिटांची वाट पाहण्याची गरज नाहीये. मतदान करणं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारने १ लाख ३८ हजार चना खरेदी करण्याची ऑर्डर काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहिलेला चना खरेदी करण्यासाठी केंद्राने प्रस्ताव पाठवला आहे. तसेच त्यालाही मंजूरी देण्यात आली आहे. जी आमची मागणी होती. ती बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. नाराजी बच्चू कडूची नव्हती. तर ही शेतकऱ्यांची नाराजी होती, असं बच्चू कडू म्हणाले.

मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार

महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, मी मतदान कुणाला केलं हे सांगता येत नसतं. मी मतदान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होईल. आमची आघाडी आगगाडीसारखी मजबूत आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

भाजपच्या आमदारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मतदानावरून आक्षेप

आक्षेपाला काहीही अर्थ नसतो. जर दोन न्यायालयाने निकाल देऊन मतदानाचा अधिकार दिला नाही. न्यायालय जर या पद्धतीने समोर जातंय. येथे पण आक्षेप घेतला जातोय. ते पण चुकीचा पद्धतीने घेतला जातोय. मी आरोपी नसून जर माझं
सभासत्व जर गेलंच नसेल तर सभासत्व कायम आहे म्हणजे अधिकार कायम आहे. एवढं या देशामध्ये होऊ शकतं. तसेच हा चित्रपटाचा ट्रेलर आहे, काहीही होऊ शकतं. आम्ही काहीही करू शकतो, हे भाजपाने वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.


हेही वाचा : महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा