Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, बच्चू कडूंची मागणी

आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, बच्चू कडूंची मागणी

Subscribe

राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या मुसळधार पावासाचा फटका अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कडू म्हणाले की, राज्यात कृषी मंत्री नसले तर आम्ही येथे आहोत. आम्ही असताना कृषी मंत्र्यांची गरज नाही. नुकसानीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आढावा घेत आहेत. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावलं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमीनी देखील खरवडून गेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पहिल्यांदा भेट घेणार आहे. फक्त अचलपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी करणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

या संकटात शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं अशी खात्री असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांने खचून जाऊ नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत. काही अडचणी आल्यास आम्हाला सांगा, आम्ही मदतीला धावून येऊ, असं बच्चू कडू म्हणाले.

अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज बच्चू कडू यांनी केली. यावेळी त्यांनी लवकरच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे.


- Advertisement -

हेही वाचा : उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतलेले निर्णय, फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -