अमरावती : शेतकरी, मेंढपाळांच्या हक्कासाठी आज, मंगळवारी (7 जानेवारी) प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर सभेत बोलताना बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधत इशारा दिला आहे. आज आम्ही शांततेत आहोत, त्यामुळे ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा, असे त्यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बच्चू कडूंच्या नेतृत्वात पहिलं मोठं आंदोलन आज करण्यात आलं. (Bachchu Kadu warns the government during a march for the rights of farmers and shepherds in Amravati)
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळ यांच्या काही मागण्यांसंदर्भात अल्टीमेटम दिला होता. मात्र, शासनाने दोघांच्याही मागण्यांकडे पाठ फिरवल्याने अखेर शेतकरी आणि मेंढपाळ यांना सोबत घेत बच्चू कडू यांनी आज अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “वाडा आंदोलन” केले. पंचवटी चौकातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरवरून दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली. मोर्चा पंचवटी चौक वरून गर्ल्स हायस्कुल चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून थेट विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यानंतर बोलताना बच्चू कडू यांनी चौफेर फटकेबाजी केली.
बच्चू कडू म्हणाले की, मी भाषणात वारंवार हिंदू शेतकरी आणि हिंदू मेंढपाळ म्हणतो आहे. मी हे का बोलतोय, कारण धर्माच्या नावाने काहीजण राजकारण करत आहेत. एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे मेंढपाळ मरतो आहे. राज्यात बिगर मेहनतीच्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र ज्यांना डोळे नाही, पाय नाही अशांना चार महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे अजित पवार कुठे गेला तुमचा वादा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज फक्त इशारा आहे. कायदा मोडून हात लावला तर उद्या हातात कायदा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला.
हेही वाचा – Anjali Damania : अंजली दमानियांनी उघड केला वाल्मिक कराडच्या वाईन दुकानाचा काळाबाजार; म्हणाल्या…
बच्चू कडू म्हणाले की, चारा आहे पण हात लावू देणार नाही हा कसला कायदा? बटेंगे को कंटेंगे म्हणता, तर मग मेंढपाळ पण कटणार ना? कारण आता कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही. तर दुसरीकडे कृषिमंत्री म्हणतात की, आर्थिक परिस्थिती चंगली नाही. त्यामुळे पुढील चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही. याचा अर्थ जेवायला बोलवायचं आणि पळून जायचं. पण हम रुकने वाले औलाद नही, चलने वाले औलाद है, न्याय हक्कासाठी मेलो तरी चालेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा
बच्चू कडू म्हणाले की, आज आम्ही शांततेत आहोत. त्यामुळे आज आमचं ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा. कारण आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. परंतु जो आमच्यात आडवं येईल त्याला आम्ही दाखवून देऊ. पुढच्या वेळस याठिकाणी आल्यावर पुन्हा जाणार नाही. मी विभागीय कार्यालयात आत जाऊन येतो, जर ऐकलं तर ठीक नाहीतर आत घुसू, असा इशाराही बच्चू कडू यांनी आंदोलनावेळी दिला होता.
हेही वाचा – Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येतील आरोपीसंबंधी सुरेश धसांची मोठी मागणी; तेरे नाम झाला पाहिजे…