भटक्या कुत्र्यांबाबतच्या बच्चू कडूंच्या वक्तव्याचे आसाम विधानसभेत पडसाद

आसाम विधानसभेत शुक्रवारी महाराष्ट्रातील आमदार बच्चू कडू यांच्या भटक्या कुत्र्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ झालेला पाहायला मिळाला. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला.

Bachu Kadu's statement on stray dogs backfires in Assam Assembly

आसाम विधानसभेत शुक्रवारी महाराष्ट्रातील आमदार बच्चू कडू यांच्या भटक्या कुत्र्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ झालेला पाहायला मिळाला. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी सदस्यांनी उठून घोषणाबाजी केल्याने कटारिया यांना 15 मिनिटांत आपले भाषण संपवावे लागले. महाराष्ट्रातील आमदारावर काय कारवाई करण्यात आली आहे किंवा करण्यात येणार आहे? असा प्रश्न देखील आसामच्या विरोधी सदस्यांकडून विचारण्यात आला आहे.

काँग्रेस आमदारांनी उपस्थित केला मुद्दा
आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी भाषण सुरू करताच काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. तर अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनीही हा मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात समाविष्ट करावा, असे सांगितले. परंतु विरोधी पक्षाच्या आमदारांनी कामकाजात व्यत्यय आणल्याने कटारिया यांना आपले भाषण मध्यंतरी संपवावे लागले.

काय आहे प्रकरण?
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबतचा प्रस्ताव अधिवेशनात मांडला. या प्रस्तावावर चर्चा करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला एक अजब सल्ला दिला.

भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दलच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा करताना आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, “खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा, नाही तर रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे आम्हाला कळलं. जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं. त्यामुळे तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवसांत याच्यावर तोडगा निघेल. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाचा विषय संपवून टाका,”

दरम्यान, बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता. अनेक प्राणी संघटनांनी बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला. बच्चू कडू यांचे विधान हे अत्यंत अमानवी आणि अपमानकारक असल्याचे मत प्राणी प्रेमी यांनी व्यक्त केलेले.

याआधी सुद्धा झारखंडचे भाजप आमदार बिरंची नारायण यांनी सुद्धा असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. भटक्या कुत्र्यांचा हल्ला रोखण्यासाठी सरकारने उपाय करावेत, अन्यथा नागालँडच्या लोकांना इकडे बोलवा, समस्या दूर होईल, असे बिरंची नारायण म्हणाले होते. बोकारोचे भाजप आमदार बिरंची नारायण यांनी झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी त्यांच्याकडून असे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते.

हेही वाचा – विरोधकांवरील कारवाईचा सिलसिला मोदी थांबवणार का?

रांचीच्या डॉग बाईट सेंटरमध्ये रोज जवळपास 300 लोक येतात, असा दावा त्यावेळी बोलताना नारायण यांनी केला होता. पाळीव प्राणी प्रेमी वैध लायसन्सशिवाय कुत्र्यांना पाळत आहेत. बोकारोमध्ये कुत्र्यांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर उपाय करण्यासाठी आणि त्यांची नसबंदी करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही, असेही तेव्हा बिरंची नारायण यांच्याकडून सांगण्यात आले होते.