Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : "वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी"; निवडणुकीआधीच आव्हाडांचा नवा नारा

Jitendra Awhad : “वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी”; निवडणुकीआधीच आव्हाडांचा नवा नारा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. विधिमंडळातील संख्याबळावरून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले. त्यामुळे आता शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावर गुरुवारी (22 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी” चिन्ह दिले आहे. यानंतर आता शरद पवार गटाने नेते जितेंद्र आव्हाड “वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी” असा नारा देत अजित पवार गटाला नाव न घेता इशारा दिला आहे. (Bajwa Tutari and Gada Gaddari Jitendra Awhads new slogan before the election)

हेही वाचा – Supriya Sule VS Sunetra Pawar : लोकसभेच्या तयारीला सुरुवात ? बारामतीत भेटीगाठी वाढल्या

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला “तुतारी” हे पक्षचिन्ह दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एका योद्ध्याला शोभेल असंच हे पक्षचिन्ह आहे. 84 वर्षांचा म्हातारा, होय मी त्यांना असंच म्हणतो. कारण 84 वर्षांचा म्हातारा युद्धाला उभा राहिला आहे आणि संकेत काय मिळाले आहेत? तर “तुतारी”. त्यामुळे आता “वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी”. तुतारी वाजली आहेच आणि आम्ही युद्धासाठी आता तयार आहोत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय भूमीतले भीष्माचार्य म्हणजे शरद पवार त्यांच्यासह आम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहोत. “लडेंगे और जितेंगे”, परत एकदा सांगतो “वाजवा तुतारी” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला नाव न घेता इशारा दिला आहे.

हेही वाचा – Navi Mumbai Bus Service: उरणला जाणारी बससेवा बंद; ‘या’ कारणामुळे NMTT ने घेतला निर्णय

‘तुतारी’ चिन्ह महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ पक्ष अजित पवार गट मानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव दिले. मात्र हे नाव राज्यसभा निवडणुकीपुरतेच असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते आणि राज्यसभा निवडणुकीत चिन्हाची गरज नाही म्हणून शरद पवार गटाला चिन्ह दिले नाही. याविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवून एक आठवड्याच्या आत निवडणूक चिन्ह देखील देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावे अशी विनंती केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या 19 फेब्रुवारीच्या आदेशानुसार ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह त्यांना वापरता येणार आहे. पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत ‘तुतारी’ हे चिन्ह पोहचवण्याचे आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे.