मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्तानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकास्त्र सोडले आहे. देशातील हिंदुत्वाच्या नावाने सुरू असलेले ढोंग बंद करून खरे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे, त्या प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही सामना करत आहोत, हीच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आहे, असं म्हणत मोदी-शहांवर राऊतांनी टीका केली आहे. (Balasaheb Thackeray Jayanti Sanjay Raut Slams Amit Shah and Narenra Modi Sanjay Raut News In Marathi)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माहीत नाहीत. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत काय झूंज दिली हे अमित शहा यांना माहीत नाही. विशेष म्हणजे ही झूंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहा यांच्याशी सुद्धा देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे, त्या प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही सामना करत आहोत, हीच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
मोदी-शहांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही – राऊत
“बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महाराष्ट्रात मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट होते. त कृतीशील हिंदूहृदयसम्राट होते. हातात कोणतीही सत्ता नसताना बाळासाहेबांनी देशासाठी लढा दिला. महाराष्ट्रात कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला आणि लढा दिला. तसेच, शिवसेनेच्या माध्यमातून कवच कुडल या महाराष्ट्रासाठी निर्माण केलं. ही कवच कुंडल शहा-मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी-शहांवर निशाणा साधला.
‘देशाच्या राजकारणात हिंदूत्वाच्या नावाने जे ढोंग सुरू’
“आम्ही चोऱ्या, माऱ्या, लांड्या, लबाड्या करून राजकारणात थांबलेलो नाही. बाळासाहेबांचा एक विचार होता. बाळासाहेबांना ढोंग आवडत नसून ते त्यावर हल्ला करत होते. या देशाच्या राजकारणात हिंदूत्वाच्या नावाने जे ढोंग सुरू आहे, त्या ढोंगाचं प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना करत आहे. हाच बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नाने सन्मानित करा’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माझं आव्हान आहे की, ही ढोंग बंद करा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नाने सन्मानित करा, तरच तुम्ही खरे असाल. ही शिवसेनेची मागणी आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. देशात मोदी-शहा आल्यापासून नियम डावलून जे लोकं भारतत्नाला योग्य नाहीत, त्यांनाही तुम्ही भारतरत्न दिला. पण ज्यांनी हिंदूत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं, त्या बाळासाहेबांना भारतरत्न का दिला नाही, 2026 पासून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्याआधी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही आमची मागणी आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिलास, तो वीर सावरकरांचा गौरव झाल्यासारखे असेल”, अशी मागणीही यावेळी संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा – Sanjay Raut : स्वत:कडे मुख्यमंत्रिपद न ठेवता बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला मोठं केलं – संजय राऊत