घरमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गाला आधी विरोध आता बाळासाहेबांच्या नावाची मागणी

समृद्धी महामार्गाला आधी विरोध आता बाळासाहेबांच्या नावाची मागणी

Subscribe

शिवसेना आमदार-खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सुरुवातीला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध आणि नंतर या महामार्गाबाबत शिवसेनेने घेतलेली मवाळ भूमिका हे सगळ्यांनाच माहीत आहे. यावरून शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता या महामार्गाला स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले. मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतग्रती महामार्ग आजही आदरणीय बाळासाहेबांच्या दूरदृष्टीची साक्ष देत राज्याच्या विकासात योगदान देत आहे. त्यामुळेच देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा सन्मान व्हावा, अशी मागणी शिवसेना आमदार आणि खासदारांनी या पत्रातून केली आहे.

राज्याचा आर्थिक चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. कारण देशातल्या पहिल्या वहिल्या महामार्गाचे श्रेय बाळासाहेबांना जाते. तसेच हा समृद्धी महामार्ग होताना शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये ही शिवसेनेची भूमिका होती. तसेच समृद्धी महामार्गाला होणारा विरोध आता मावळला असून शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला थेट मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर कोणत्याही पद्धतीने अन्याय होणार नसून 90 टक्के जमीन ताब्यात आली आहे. लवकरच या महामार्गाचे भूमीपूजन होणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाचे काम गतीने करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरियन शिष्टमंडळाला दिले आहेत. तसेच एशियन इन्फ्रास्ट्रर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले दक्षिण कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतली होती.

मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग हा सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा जगातील एकमेव मार्ग व्हावा. कोरियन कंपनीचे काम व तंत्रज्ञान उत्तम आहे, पण कामात गती हवी. जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, काम त्वरित होण्यासाठी कोरियन तज्ज्ञांनी पाहणी करावी. महामार्ग आणि रस्ते सुरक्षा याबद्दलच्या तंत्रज्ञानावरही अधिक भर द्यावा. रस्त्यामधील स्मार्ट घटक आणि स्मार्ट तंत्रज्ञानालाही प्राधान्य द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -