पालघरच्या दुर्वेश-देसकपाडात बांबू हस्तकलेचे वर्ग, आदिवासी महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई : सेवा विवेक सामाजिक संस्थेमार्फत स्वयंरोजगाराच्या बहुउद्देशाने पालघरमधील दुर्वेश – देसकपाडा गावात बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण उपक्रमाची ही 17वी तुकडी आहे. हे प्रशिक्षण मोफत असून 30 दिवस चालणाऱ्या या उपक्रमाचा लाभ 40 आदिवासी महिलांना मोफत होणार आहे.

सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार मिळावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, यादृष्टीने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना बांबू हस्तकलचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. पालघर तालुक्यातील दुर्वेश – देसकपाडा येथील प्रशिक्षणवर्गामध्ये कुशल बांबू हस्तकला शिकलेल्या सेवा विवेक संस्थेतील कुशल प्रशिक्षक महिलांद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सेवा विवेकच्या ग्रामपातळीवर बांबू ग्रामोद्योगाच्या माध्यमातून पालघर जिल्हातील ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने बांबूपासून अनेक आकर्षक वस्तू तयार करण्यात येतात. मागील काही वर्षांपासून पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे. यामध्ये बांबूपासून राखी, पेन होल्डर, मोबाइल होल्डर, फिंगर जॉइंट ट्रे, कंदील, बांबू ट्रॉफी आदी सारख्या 40हून अधिक हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार केल्या जात आहेत.

उत्पादनाचा दर्जा राखण्यात येत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांच्या रोजगारनिर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबूकाम करून रोजगाराची संधी मिळाली आहे. 2022 सालच्या अखेरीस सादर झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा विवेक संस्थेच्या महिला सक्षमीकरण कार्याची प्रशंसा केली होती.

हेही वाचा – इंग्रजी प्रश्नपत्रिकेनंतर बोर्डाने आणखी एका प्रश्नपत्रिकेत केला घोळ; विद्यार्थी संतप्त