बंजारा समाजाचे सुनील महाराज यांनी केला शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

sunil maharaj

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. विविध समाजातील लोकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला असून आता बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी हाती शिवबंधन बांधलं.

पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला आनंद आहे. आपण म्हणत होतो की साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा. आता नवरात्रीतच सुनील महाराज इथे आले आहेत. बंजारा समाजाचे कडवट सैनिकही त्यांच्यासोबत आहेत.

हेही वाचा – एक नेता, एक झेंडा, एक मैदान…; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित

सुनील महाराज यांचं स्वागत करतानाच उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्यावर टीका केली. “मध्यंतरी आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण यांना जेव्हा लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेना प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे याचं भवितव्य घडवण्याची. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवीलाही मी जरूर जाईन”, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, अजित पवारांचे अब्दुल सत्तारांच्या टीकेला उत्तर

“संजय राठोडांसोबत आम्ही होतो. आता आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत आहोत. त्यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकरलं आहे. आम्ही महाराष्ट्रात दौरा करणार आहोत. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा पूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे शिवसेवा संकल्प दौरा काढला जाणार आहे, असं सुनील महाराज म्हणाले.