बँकांच्या वसुली ‘भाईं’ना चाप; आरबीआयची लवकरच नियमावली

नाशिक : कर्जाची वसुली करताना अनेकदा बेकायदेशीर मार्गांचा वापर केला जातो. यामुळे कर्जदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातून ते नैराश्याच्या गर्तेतही सापडतात. अनेकदा कर्ज वसुलीसाठी बँका गावगुंडांची मदत घेतात. अशा ‘भाईं’कडून कर्जदारांना शिवीगाळ व मारहाणही केली जाते. मात्र, आता रिझर्व्ह बँकेने वसुली भाईंना चाप लावण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, वसुली एजंटांसाठी आदर्श नियमावलीदेखील जारी केली आहे.

साधारणपणे आपत्कालीन परिस्थितीत, अचानक काही आवश्यक गरज असेल तेव्हा किंवा विविध कारणास्तव नागरिक कर्ज घेतात. सुरूवातीचे काही हप्ते भरल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे, उत्पन्नात पडलेल्या खंडामुळे किंवा व्यवसायातील मंदीमुळे त्यांना पुढचे हप्ते भरणे शक्य होत नाही किंवा त्यासाठी विलंब होतो. परिणामी कर्जदार डिफॉल्टरच्या यादीत जातात. अशावेळी बँकांकडून कर्जवसुलीसाठी रिकव्हरी एजंट्सचा वापर केला जातो. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद असा कोणत्याही माध्यमाचा उपयोग केला जातो. वेळीअवेळी फोन करून कर्जदारांवर दादागिरी करणे, शिवीगाळ करणे, अनेकदा कर्जदाराला मारहाण करणे, अपमानित करणे, जबरदस्तीने कर्जदाराच्या त्याच्या घरात घुसून त्याच्या घरातल्या चीजवस्तू जप्त करणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात.

नाशिकमध्येदेखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, भाईंमुळे अनेक नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, रिझव्ई बँक ऑफ इंडियाने रिकव्हरी एजंट्सच्या या हरकतींची गांभीर्याने दखल घेतल्याने यावर कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. हे रिकव्हरी एजंट्स चुकीच्या पद्धतीने वागतात, त्यांची वागणूक स्विकार्ह नाही, अशा शब्दांत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. ज्या अनियंत्रित फायनान्स कंपन्यांकडून हे प्रकार सर्रास होतात. याबाबतच्या तक्रारी आरबीआयकडे प्राप्त झाल्या आहेत. तर काही नियंत्रित फायनान्स कंपन्यांकडूनही असे प्रकार होत असल्याचे दास यांनी सांगितले. आता याबाबत तक्रारी आल्यानंतर कायदेशीर कारवाई करणार्‍या यंत्रणांना याची माहिती दिली जाणार असल्याचेही दास म्हणाले.

कर्ज वसुलीसाठी काय आहे नियमावली

  • लोक रिकव्हरी एजंटस कर्जदारांना धमकी किंवा दादागिरी करू शकत नाही
  • शारिरिक दुखापत वा तोंडी शिवीगाळही करू शकत नाही
  • कर्जदारांना सकाळी ९ पूर्वी आणि संध्याकाळी ६ नंतर फोन करणे हा गुन्हा आहे.
  • कर्जवसुलीसाठी गुंडगिरीचा वापर करणे किंवा त्याची धमकी देणे हे छळात मोडते.
  • कर्जदार काम करत असलेल्या कामाच्या ठिकाणी सूचना न देता जाणे गैर मित्रांना किंवा सहकारयांना धमकीचे फोन करू नये.
  • धमकीत अभद्र भाषेचा वापर छळाचाच भाग मानला जातो.