घरमहाराष्ट्रभाजपात प्रवेश देणे आहे

भाजपात प्रवेश देणे आहे

Subscribe

अलिबागमध्ये झळकला बॅनर

बालवाडी, नर्सरी, केजी, पहिली ते पाचवी या वर्गात तसेच, इतर ट्युशन क्लासमध्ये प्रवेश देणे सुरू असल्याच्या जाहिराती किंवा बॅनर आपण कुठे ना कुठे पाहत असतो. पण चक्क एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश सुरू असल्याचा बॅनर अलिबाग शहरात झळकला असून, तो खमंग चर्चेचा विषय झाला आहे.

भाजपा प्रवेशाचा हा बॅनर कुणी लावला, हे अद्यापही गुलदस्त्यात असले तरी तर्कवितर्क लढविण्यात मात्र सगळेच मश्गुल आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची भाजपासह शिवसेनेतही प्रवेश करण्याची लगीनघाई सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप विरोधात लढण्यासाठी कोणी विरोधक राहणार आहेत की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरातील एचपी पेट्रोल पंपाशेजारील बायपास रस्त्याच्या बाजूला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोणी अज्ञातांनी ‘भाजपात प्रवेश देणे आहे’, अशा आशयाचा बॅनर दर्शनी भागावर लावला आहे. या बॅनरमध्ये नियम व अटी, तसेच टीपही दिली आहे. प्रवेशासाठी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री नंबरही देण्यात आला आहे.

- Advertisement -

हे बॅनर लावून एकप्रकारे भाजपची खिल्ली उडविण्याचा उद्देश स्पष्ट होत असला तरी अशा एखाद्या पक्षातील प्रवेशाबाबतचे उपहासात्मक बॅनर पहिल्यांदाच लागल्याने सर्वसामान्यांची मात्र करमणूक होत आहे. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती, सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव, विचारधारेची कुठली अट नाही, जागा भरल्यास मित्र पक्षात सोय करता येईल, अशा या अटी व टीप आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -