उद्धव ठाकरेंची आज मालेगावमध्ये जाहीर सभा; शहरात उर्दू भाषेत लावण्यात आले बॅनर

खेडनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी (ता. २६ मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा घेण्यात येणार असल्याने या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Banners were put up in Urdu language for Uddhav Thackeray's meeting in Malegaon

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता ठाकरे गटामध्ये कमालीची अस्वस्थता जाणवू लागली आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यभरात जाहीर सभा घेण्यात येत आहेत. खेडमध्ये घेण्यात आलेल्या सभेनंतर आता लगेच उद्धव ठाकरे यांची आज रविवारी (ता.  26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार असलेले दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही जाहीर सभा घेण्यात येणार आहे. दादा भुसे हे सध्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. तसेच ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या मालेगाव मधील सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे आपल्या सभेमध्ये नेमके आज काय बोलणार? आणि जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांवर निशाणा साधणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत. मालेगाव मधील एमएसजी महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सभा होणार आहे. एक लाख लोक बसतील अशा पद्धतीची सोय सभेसाठी करण्यात आलेली आहे. या प्रांगणात भव्य असे व्यासपीठ सुद्धा उभारण्यात आलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

महत्वाची बाब म्हणजे मालेगावमध्ये मुस्लिम समाज अधिक असल्याने येथील चौकाचौकात उर्दू भाषेमध्ये बॅनर लावलेले पाहायला मिळत आहेत. “शिवसेनेचा मालेगाव.. मालेगावची शिवसेना.. शिवगर्जना” अशा आशयाचे पोस्टर्स मालेगाव शहरांमध्ये लावण्यात आलेले आहेत. ज्यामुळे आता सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटावर जोरदार टीका करण्यात येत आहे. परंतु उर्दू भाषा ही सर्वांचीच आहे, उर्दू भाषेमध्ये बॅनर लावले तर त्यात गैर काय? असे म्हणत संजय राऊत यांनी या बॅनरबाजीला समर्थन दिले आहे. तर या आधी सुद्धा या शहरात ठाकरे गटाचे उर्दू भाषेतील कॅलेंडर छापून त्याचे वाटप करण्यात आलेले होते. त्यामुळे सुद्धा ठाकरे गटावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला होता. परंतु आता लावण्यात आलेल्या या उर्दू भाषेतील बॅनरमुळे देखील सत्ताधारी ठाकरे गटावर निशाणा साधत आहेत.

दरम्यान, पूर्णतः तळाला गेलेल्या ठाकरे गटाला उभारी मिळावी आणि मालेगावमधील मुस्लिम समाज आकर्षित व्हावा, यासाठी उर्दू भाषेतील होर्डिंग्स लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक