मुंबईत बॅनरवॉर! पंतप्रधान मोदींचा बाळासाहेबांना वाकून नमस्कार; भाजपालाच डिवचण्याचा प्रयत्न

PM Narendra Modi Mumbai Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला असून या फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांसमोर वाकलेले आहेत. Bannerwar in Mumbai

bannerwar

Bannerwar in Mumbai | मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई मेट्रो २ए आणि ७ यांसह विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करण्याकरता मोदी आज मुंबईत असणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याकरता मुंबईत जागोजागी मोठाले होर्डिंग्स, कटआऊट्स, बॅनर्स लावण्यात आले आहे. मात्र, यामध्ये एका बॅनरने लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला असून या फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांसमोर वाकलेले आहेत.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘असे’ असेल मुंबई भेटीचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या काही दिवसांतच मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर युतीकडून जोरदार तयारीही सुरू झाली आहे. आजच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन हेसुद्धा या निवडणुकांच्या प्रचाराची नांदी असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामांचं उद्घाटन होणार असल्याने संपूर्ण मुंबईचं या कार्यक्रमांकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान, मोदींच्या स्वागतासाठी मुंबईभर बॅनर्स झळकवण्यात आले आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाईन्स येथील बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत.

हेही वाचा – मुंबईत आज ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेत बदल; मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ बातमी वाचा

एका बाजूला विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाचे बॅनर लावलेले असताना त्याचबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बॅनरवर फक्त फोटोच असून त्यावर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे हे बॅनर्स नक्की लावले कोणी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला डिवचण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं जातंय.