घरमहाराष्ट्रबारसू प्रकल्प विरोधाचा ठाकरी सूर!

बारसू प्रकल्प विरोधाचा ठाकरी सूर!

Subscribe

प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून रणकंदन सुरू असताना शनिवारी कोकणच्या दौर्‍यावर असलेल्या ठाकरे बंधूंचे सूर रिफायनरीच्या मुद्यावर पहिल्यांदाच जुळल्याचे दिसले. प्रकल्पाविरोधातील ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलगावमधील स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिकांचा विरोध असेल तर रिफायनरी कोकणात आणून पर्यावरणाची हानी करू नका. जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत आहात. हे चालणार नाही. ही हुकूमशाही मोडून काढू. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू, असा इशारा ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला, तर दुसरीकडे रत्नागिरीत घेतलेल्या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचे अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? ज्या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभे आहात. कवडीमोलाने आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका, असे आवाहन त्यांनी कोकणवासीयांना केले.

प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी बारसू ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर रात्री महाड येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बारसूची जागा मी मुख्यमंत्री असताना सुचवल्याचे ते सांगतात, परंतु ही जागा सुचवताना येथेच प्रकल्प करा, असे सांगितले नव्हते.

आमची एकच भूमिका आहे जर रिफायनरीला बारसू सोलगावच्या लोकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कोकणात येता कामा नये. पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प नको, पण सरकारने जी काही दडपशाही चालवली आहे त्यावरून या प्रकल्पात काहीतरी काळेबेरे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत आहेत. हे चालणार नाही. ही हुकूमशाही मोडून काढू, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

- Advertisement -

राज्यकर्त्यांनी सुपारी घेतली असेल तर आम्ही कोकणची सुपारी घेतो. भांडवलदारांची सुपारी घेत नाही. हे उपर्‍यांचे दलाल असून जमिनी विकण्यामध्ये यांनी मलिदा खाल्ला आहे, असा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला. सोबतच उपर्‍यांची सुपारी घेऊन आमच्या गावच्या स्थानिकांवर वरवंटा कशासाठी फिरवताय, असा सवालही त्यांनी केला. भूमिपुत्रांवर लाठ्या चालवताय. प्रकल्प चांगला आहे तर लाठ्या कशाला? जनतेत जाऊन का सांगत नाही प्रकल्प चांगला आहे म्हणून? तडीपारी, जिल्हाबंदी लावताय, लोकांना विश्वासात का घेतले जात नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

कातळ शिल्प युनेस्कोच्या यादीत
उद्धव ठाकरे यांनी बारसूतील अश्मयुगीन काळातील कातळ शिल्पांची पाहणी केली. ही कातळ शिल्प रिफायनरीतील जागेत येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. हा महाराष्ट्रातला पुरातन वारसा जपण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी सहमती दाखवत येथील कातळ शिल्प युनेस्कोच्या यादीत असून युनेस्कोच्या नियमानुसार वारसा ठेवीच्या १ हजार मीटरच्या परिसरात कोणताही प्रकल्प उभारता येत नाही, असा दाखलाही राज ठाकरेंनी आपल्या भाषणात दिला.

- Advertisement -

कवडीमोलाने जमिनी विकू नका – राज ठाकरे

आपल्या कोकण दौर्‍यात रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सभा घेतली. यावेळी राज यांनी आपल्या भाषणात कोकणातील पायाभूत सुविधांची लागलेली वाट आणि विकास प्रकल्पांवरून सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत. अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळे होणार. मुंबई-गोवा महामार्गाचे काम २००७ ला सुरू झाले, पण तरीही अजून काम पूर्ण झालेले नाही.

कारण निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केले तरी निवडून देणार आहेतच, मग कशाला कामे करायची. मागच्या वेळेला मुंबई-गोवा हायवेवरून रस्त्याची दुर्दशा पाहून मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, मग नितीन गडकरींना फोन केला आणि रस्त्याची काय अवस्था आहे हे सांगितले. तर ते म्हणाले की, कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. मला सांगा एकही लोकप्रतिनिधी विचारतोय का की कॉन्ट्रॅक्टर का पळून गेला? समृद्धी महामार्ग ४ वर्षांत झाला, मग १५ वर्षांत मुंबई-गोवा महामार्ग का नाही झाला, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

कोकणातील जमीन विक्रीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसे नाही की शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत ते. लोकप्रतिनिधींना माहीत असते कुठे प्रकल्प येणार ते, मग तेच जमिनीचे व्यवहार करून हजार पट नफा कमावतात. लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्याकडून कवडीमोलाने जमीन घेतात आणि सरकारकडून भरमसाठ पैसे घेतात. यावर कोणीही बोलत नाही. यामुळे कोकणासारखा प्रतिभासंपन्न भाग, पण त्याची अवस्था बिकट झाली आहे. कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नांपैकी ६ भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावान कोकणी माणसाला काय झाले आहे?

शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरीबाबत? खासदार म्हणतात होणार नाही. पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की, लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? इथल्या जमिनी हडपणे, त्यातून बक्कळ पैसा कमावणे इतकेच इथल्या लोकप्रतिनिधींचे उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणार्‍या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच, असे आवाहनही राज ठाकरेंनी कोकणवासीयांना केले.

अजित पवारांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून कोण कुठल्या पक्षात आहे हे लक्षातच येत नाही. शरद पवारांच्या राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता, तो काल संपला. खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता? राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, तू गप्प बस, तू शांत बस, माईक हातातून घे. पवार साहेब म्हणाले असतील, मी आता राजीनामा दिला तर हा माणूस असा वागतोय, उद्या मलाही गप्प बसायला लावेल. त्यामुळेच पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला असेल. खरंतर अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या. होतेय ते बरे होतेय, असे अजित पवारांना वाटत होते, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -