श्रेयाची लढाई!…अन् मंचावर एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांसमोरच सेना आणि राष्ट्रवादी नगरसेवक भिडले

ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही मंचावर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपस्थित होते, मात्र कार्यकर्त्यांनी त्या दोन्ही नेत्यांच्या समोरच राडा घातला. या उड्डाणपुलामुळे ठाणेकरांची मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

ठाणे : ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावरून जोरदार राजकारण रंगू लागलंय. खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या श्रेयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यावरूनच आता दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही मंचावर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपस्थित होते, मात्र कार्यकर्त्यांनी त्या दोन्ही नेत्यांच्या समोरच राडा घातला. या उड्डाणपुलामुळे ठाणेकरांची मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचे बॅनर लावल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच हा वाद फक्त बॅनरबाजीवर न थांबता एकमेकांसोबत भिडण्यापर्यंत जाऊन पोहोचला. आम्ही पाठपुरावा केला आणि बॅनरबाजी तुमची, असं सांगत दोन्हीकडील कार्यकर्ते भिडले. विशेष म्हणजे नगरसेवकांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी शाब्दिक चकमक झाल्याचं दिसलं.

खरं तर जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आलीय, या सगळ्या वादाला बॅनरबाजीवरून सुरुवात झालीय. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा कार्यकर्ते आमनेसामने आलेत.

खरं तर एप्रिल महिन्यात हा पुल खुला होईल असे आश्वासन स्वत: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. परंतु यात अडचणी आल्यानंतर 20 डिसेंबरला हा पूल खुला होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 25 डिसेंबरची तारीख पुढे आली होती. याचदरम्यान राजकीय वातावरण ही तापू लागले होते.


हेही वाचा : कळवा- खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाला अखेर मुहूर्त सापडला