मुंबई : कधी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने तर फोनवर बोलताना अपघात घडल्याच्या घटना राज्यात काही नवीन नाहीत. परंतू बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे जीव जातो तो सर्वसामान्य प्रवाशांचा. हाच प्रकार रोखण्यासाठी एसटी महामंडळाने आदेश निर्गमीत केले आहे. आता यापुढे चालक एसटी बस चालवताना फोनवर बोलताना आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयानंतर एसटी बस चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. (Be careful if you talk on the phone while driving an ST bus Warning of direct action from the corporation)
एसटी बस चालवत असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून गाणी, व्हिडीओ ऐकणे, बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना फोनवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, फोनमधील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत. अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.
हेही वाचा : ‘माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल
खासगी बस चालकांसाठी निर्णय कधी?
वाढते एसटी बसचे अपघात लक्षात घेता एसटी महामंडळाने 20 नोव्हेंबर रोजी आदेश काढत बस चालकांना बस चालवताना फोनवर बोलणे प्रतिबंधित केले आहे. असे असताना मात्र, दुसरीकडे राज्यात खासगी बसेससुद्धा मोठ्या प्रमाणात धावतात. तेव्हा या खासगी बस चालकांसाठी आरटीओ विभाग कधी निर्णय घेतो हे पहावे लागणार आहे.