मुंबई : बीडमधील अजित पवार गटाची सभा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या सभेत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर बीडमधील नागरिकांनी गोंधळास सरुवात केल्यावर त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेंव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 28, 2023
मी 23 डिसेंबर 2003मध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हा मी गृहमंत्री देखील होतो. त्या काळात मी तेलगीला अटक करताना मकोका लावण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी एका वाहिनीवर दगडफेक झाली आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या, असे तुम्ही सांगितले. पण त्या वाहिनीच्या प्रमुखांनी, भुजबळांचा दोष नाही, असे स्पष्ट केले होते. असे असतानाही तुम्ही माझा राजीनामा का घेतला? असा सवाल भुजबळ यांनी पवार यांना केला होता.
हेही वाचा – शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
छगन भुजबळ यांच्या अशा प्रकारच्या टीकेनेतर बीडमधील नागरिकांनी त्यांना रोखण्यासाठी गदारोळ केला. त्यामुळे भुजबळ यांना भाषण थांबवावे लागले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. बीडमध्ये मोठे स्वागत झाले, पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा शरद पवार यांच्याविरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले, त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपले भाषण गुंडाळावे लागले.
संपूर्ण सभेत जेव्हा भाजपाची आरती गायली गेली, तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आले…. कारण बारामती असो किंवा बीड, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असेही रोहित पवार यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – अजित पवार गटाला चिन्हही मिळणार; प्रफुल्ल पटेल यांनी दावा करताना तारीखही सांगितली
टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी आपल्या बारामती मतदारसंघाचा दौरा केला. तिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र त्यावरूनही काल, रविवारी रोहित पवार यांनी टीका केली होती. बारामतीची जनता कामाला पाठिंबा देणारी असल्याने आजवर झालेली कामे बघता त्यांनी अजितदादांना नेहमीच डोक्यावर घेतले. पण हे बारामतीकर खूप हुशार आहेत, शनिवारी अजितदादांच्या भाषणात टाळ्या वाजवायचे आणि भाजपा व त्यांच्या नेत्यांचा उल्लेख झाल्यावर मात्र गप्प बसायचे. हा टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका आहे आणि तो संपूर्ण राज्यातच ऐकायला मिळणार आहे, अशी कोपरखळी त्यांनी लगावली.