Homeमहाराष्ट्रमराठवाडाPankaja Munde : सुरेश धस बीडला बदनाम करत आहेत; पंकजा मुंडेंच्या आरोपावर...

Pankaja Munde : सुरेश धस बीडला बदनाम करत आहेत; पंकजा मुंडेंच्या आरोपावर भाजप आमदारांचा पलटवार

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महायुतीतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आज धाराशिवमध्ये झालेल्या सभेत सुरेश धसांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. अजित दादांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढावे अशी विनंती केली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी निर्माण केलेल्या परळी पॅटर्नचे वाभाडे सुरेश धस प्रत्येक मंचावर काढत आहेत. सुरेश धसांच्या या आक्रमक पवित्र्यावर त्यांच्याच पक्षाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरेश धस बीडला बदनाम करत असल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला. बीड सारख्या घटना इतरही जिल्ह्यात घडत असल्याचं त्या म्हणाल्या.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी परळीतील गुन्हेगारी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा यावर प्रतिक्रिया दिली. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीतील गुन्हेगारीबद्दलचे आकडे मला माहित नाही. मात्र सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम होत आहे. धसांनी राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशीलतेनं समजून घेतला असता तर बीड जिल्हा असा बदनाम झाला नसता. आमच्या जिल्ह्यातील लोक स्वाभिमानी आहेत. मी महिला राजकारणी म्हणून तिथं काम करते. सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो, नाहीतर दरोडे टाकायला गेलो असतो ना. अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर, आरटीआय मधून माझ्या कडे सर्व जिल्ह्यांची महिती आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येबद्दल पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली, त्यावर त्या म्हणाल्या की, यावर माझी प्रतिक्रिया काय असणार? गृहविभागाने निर्णय घेतला आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. एका तरुणाची निर्घृण हत्या झाली. ज्यांना राजकारण करायचं ते करत आहेत, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सुरेश धसांवर टीका केली.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचा – पंकजा मुंडे

मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर म्हटले की, तो प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी म्हटलं आहे की, तपास लागेपर्यंत कारवाई नाही. मी दोषी असेल तर माझ्यावरही कारवाई होईल. त्यावर मी काऊंटर करणार नाही.

सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर पलटवार

सुरेश धस बीडला बदनाम करत आहेत, या मंत्री पंकजा मुंडेंच्या आरोपावर आमदार सुरेश धस यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, बीडला आम्ही बदनाम करत नाही. परळी पॅटर्नबद्दल बोलत आहे. परळी पॅटर्न तुमच्याशिवाय होऊ शकतो का? सर्व जिल्ह्यात पिकविमा भरणारे परळीचेच लोक कसे काय असतात? हे तुमच्या माहितीशिवाय होणार आहे का?

हेही वाचा : Suresh Dhas : भरसभेत सुरेश धसांनी टाकला बॉम्ब; गुजरात ड्रग्ज तस्करांसोबत धनंजय मुंडेंचे फोटो

Unmesh Khandale
Unmesh Khandale
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.