Homeमहाराष्ट्रBeed : सुरेश धस यांचा आधुनिक भगीरथ असा उल्लेख, काय म्हणाले मुख्यमंत्री?

Beed : सुरेश धस यांचा आधुनिक भगीरथ असा उल्लेख, काय म्हणाले मुख्यमंत्री?

Subscribe

बीड : गेल्या महिन्याभरापासून बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या महिन्याभरापासून हे प्रकरण लावून धरले होते. यावेळी त्यांनी महायुतीचेच मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यानंतर बुधवारी (5 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आलेले असताना आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ असा केला. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Beed CM Devendra Fadnavis on MLA Suresh Dhas and Beed work)

हेही वाचा : School Bus New Rate : नव्या शैक्षणिक वर्षात पालकांच्या खिशाला कात्री, शालेय बसभाडे वाढणार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी आष्टी तालुक्यातील साठवण तलाव प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ असा उल्लेख केला आहे. तसेच, या भाषणामध्ये त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला आहे. ते पुढे म्हणाले की, “आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मित्ती केली. त्याप्रमाणेच सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या इथे नांदायचे आहे. तसेच, एक नवीन बीड आपण तयार करू,” असे ते या भाषणात म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “एका महत्त्वाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी मी इथे आलो आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले, त्यानंतर कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला 23 टीएमसी पाणी मिळायला हवे, असा निर्णय झाला. पण, दुर्दैवाने काही कारणास्तव फक्त 7 टीएमसी पाणी आपल्याला मिळाले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 23 टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यायचा निर्णय घेतला, पण केवळ 7 टीएमसीच पाणी असल्याचे दिसून आले. त्यातच, आमदार सुरेश धस यांच्या मागणीनुसार, महायुती सरकारने पहिली सुप्रमा आष्टीमधील या प्रकल्पाला दिली. तब्बल 11 हजार कोटी रुपयांची सुप्रमा या कामाला देण्यात आली.” असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी, ‘तुम्हाला तर माहिती आहे, सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात,’ असे विधान केले.