बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अजुनही पोलिसांचा तपास सुरू आहे. राज्यातील अनेक यंत्रणा या हत्येप्रकरणी चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील अनेकांचे शस्त्र परवाने रद्द केले. दहशत माजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. पण असं असलं तरी, पोलिसांचा वचक बीडमधील हल्लेखोरांवर नाही असंच पाहायला मिळते आहे. कारण संतोष देशमुख हत्येनंतर अंबाजोगाई परिसरात गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. (Beed Crime News cancellation of Weapon licenses by the police but firing still happens in ambejogai)
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगरमध्ये राहात असलेल्या सिद्धेश्वर नवनाथ कदम याच्यावर गणेश पंडित चव्हाण याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आला, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपासाला सुरूवात केली आहे. मात्र जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा सिद्धेश्वर कदम यांच्या पत्नीला गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक वादातून सतत धमकी देत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रारही देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी तो पुन्हा कदम यांच्या घरी आला आणि वाद घालू लागला. यावेळी त्याने सिद्धेश्वरच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने गोळी लागली नाही. आरोपी तरुणाकडे कुठलाही शस्त्र परवाना नसून, त्याने गावटी कट्ट्याचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे
या घटनेनंतर बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण सातत्याने बीडमध्ये होणाऱ्या हल्ल्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणांवर सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या बीड जिल्हा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. यासह बीड आणि आसपासच्या भागात सहजासहजी मिळणाऱ्या गावठी कट्ट्याचीही चर्चा सुरू आहे. कोणताही परवाना नसताना गावठी कट्टे बाळगणाऱ्या अनेकांवर पोलीस कारवाई सुरू आहे.
बीडमधील 160 शस्त्र परवाने रद्द
दरम्यान, बीडमधील घटनेनंतर सुरूवातीला पोलिसांनी 100 आणि आता गुरुवारी आणखी 60 शस्त्र परवाने रद्द आणि निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा आकडा 160 वर पोहोचला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील शस्त्र परवान्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यानंतर आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विरोधी व सत्ताधाऱ्यांनी यावर आवाज उठवला. परंतु त्याआधीच तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या लोकांकडे शस्त्र परवाना असलेल्यांची यादी जिल्हाधिकारी यांना पाठवली होती. अधिवेशनात मुद्दा गाजताच त्यांनी संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेतली. त्यानंतर अनेक शस्त्र परवाना रद्द आणि निलंबित केले अहेत.
हेही वाचा – Ashish Shelar : आदित्य ठाकरे वांद्र्याला कुठे यायचे त्याच उत्तर आहे; ‘सैफ’ हल्ल्यावरून शेलारांचं प्रत्युत्तर