बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 09 डिसेंबर, 2024 ला गावगुंडांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारा वाल्मीक कराड याचे नाव समोर आले. वाल्मीक कराड हा या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असून त्याने सोमवारी, 31 डिसेंबर 2024 ला पुणे सीआयडी कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले. ज्यानंतर त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली असून बीडमधील पोलीस कोठडीत त्याचा मुक्काम आहे. पण याच प्रकरणावरून आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहे. तर बाहेरील लोक कराड याला कोठडीत भेटण्यास येत असल्याचे म्हणत धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी बीड पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली आहे. (Beed Crime Santosh Deshmukh brother Dhananjay Deshmukh letter to SP, alleging that people are coming to meet Walmik Karad)
धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस अधीक्षकांच्या नावे पत्र लिहिले असून या पत्राच्या माध्यमातून धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. त्याशिवाय, त्यांनी त्यांच्या या पत्रातून बीडचे एपीआय यांच्याविरोधात तक्रार केली आहे. धनंजय देशमुखांनी पत्रात लिहिले आहे की, माझा भाऊ संतोष देशमुख यांची 09 डिसेंबर 2024 ला हत्या करण्यात आली. या घटनेला 24 दिवस उलटले, ज्या कारणास्तव मी बीड शहर पोलीस स्टेशन कार्यालयात गेलो होतो. पण यावेळी वाल्मीक कराड याला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे आले होते. यावेळी ते थेट पोलीस ठाण्यात गेले. पण त्यांनी मला पाहताच मी पोलीस ठाण्यात का आलेलो आहे? असा प्रश्न त्यांच्याकडून मला विचारण्यात आला. याचवेळी सीआयडी वाले कुठे आहेत? असे विचारत ते वाल्मीक कराड याला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले, अशी माहिती धनंजय यांनी पत्रातून दिली आहे.
तसेच, वाल्मीक कराडच्या कोठडीच्या इथून तांदळे आल्यानंतर त्यांना तुम्ही त्या 06 तारखेला पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात, असे विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की, मीच आरोपी पकडले आणि त्यांनी मला माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले याचा फोटो दाखवला. ज्यानंतर तांदळे माझ्यासोबत अरेरावी आणि संतापजनक पद्धतीने वागले. त्यामुळे मी याची माहिती महिला पोलीस कर्मचारी रेडेकर यांच्याकडे केली. पण माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी मी सीआयडीसोबत आलेलो आहे. मी त्यांचा वाहन चालक असल्याचे तांदळेंनी सांगितले. यानंतर त्यांनी महिला पोलीस कर्मचारी रेडेकर यांच्याशी सुद्धा हुज्जत घातली. ज्यामुळे रेडेकर यांनी तुमच्यावर (तांदळे) कारवाई करू, असे म्हणताच त्याठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी महिला पोलीस कर्मचारी रेडेकर यांनाच ओरडत आवाज कमी करा असे म्हटले. तर हुज्जत घालणाऱ्या तांदळे यांना बाजूच्या खोलीत बसवून काही वेळाने सोन दिले.
हेही वाचा… Beed : बीड सरपंच हत्येप्रकरणी तीन आरोपी पाहिजेत; पोलिसांची जाहिरात प्रसिद्ध
त्यामुळे या प्रकरणी तक्रार करत धनंजय देशमुख यांनी कराड ज्या ठिकाणी कोठडीत आहे, त्याठिकाणी लोक येतात कसे? हत्या करणारे मुख्य आरोपी सापडले नसताना तांदळे मला घुलेचा फोटो दाखवून माझ्यावर दबाव टाकत आहेत, अशी तक्रार धनंजय देशमुख यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे, अशा लोकांच्या कोठडीच्या ठिकाणी लोक जात असल्याने असे होत असेल तर माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपासाच्या कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा? अशी शंका माझ्या मनात असल्याचे देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून म्हटले आहे.
त्यामुळे या प्रकरणात आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले, दराडे आणि तांदळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल. माझ्या भावाची हत्या झालेली आहे, यात कोणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मीक कराड याच्यापासून दूर ठेवावे, अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते, असे धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.