बीड – अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत परळीमध्ये 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बीलांच्या आधारे पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा आमदार सुरेश धस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. बीड जिल्ह्याच्या बदनामीवरुन मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. बीडच्या अधिकाऱ्यांवर दहशत असल्याचा मुद्दा माजी पालकमंत्र्यांनी उपस्थित केला, त्यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कोणाची दहशत आहे, हे स्पष्ट सांगा असे म्हटले, यावरुन बैठकीत वादंग झाला. एवढ्या-तेवढ्या मुद्यांवरुन बोलचाल होत असते, बाचाबाची वगैरे काही झाली नाही, असे खासदार सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले तर, आमदार धस म्हणाले की गुद्यांची नाही तर मुद्यांची चर्चा झाली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री होते. त्या काळात त्यांनी पालकमंत्रीपद भाड्याने दिले होते, असा आरोप आमदार धस यांनी केला होता. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी लेखी तक्रार देण्याची सूचना आमदार धस यांना केली. बीड जिल्ह्याला बदनाम केले जात असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले. त्यावर आमदार धस आणि खासदार सोनवणे यांनी कोण बदनाम करत आहे, असा सवाल केला. बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर कोणाची दहशत आहे, हेही उघड करा, असा सवाल सुरेश धस आणि खासदार सोनवणे यांनी केला. यावरुन पालकमंत्री अजित पवारांसमोरच मंत्री मुंडे आणि सुरेश धस, बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बीलांचे आधारे पैसे उचलण्यात आले, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सविस्तर माहितीचा पेन ड्राईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यक डिसले यांना बुधवारी रात्रीच दिला आहे. पेन ड्राईव्ह दिल्यापासून जिल्ह्यातील 500 लोक कोमात गेले असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला.
आमदार सुरेश धस यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरली. बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. अनेक अधिकारी 10 ते 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणाऱ्यांचा मुद्दाही आमदार धस यांनी उपस्थित केला. आमदार सुरेश धस हे परळीमधील गुन्हेगारीच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक आहेत. परळीमध्ये हायवा चालवणाऱ्यांनी पोलिस अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा आणि झेंटाफेंटा सुरु करावे, असा टोला त्यांनी परळीतील पोलीस अधिकाऱ्यांना लगावला.
बैठकीत काय झाले, खासदार सोनवणेंनी सांगितले…
खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, बीडमध्ये अधिकाऱ्यांवर दहशत असल्याचा मुद्दा माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. दहशतीच्या मुद्द्यावरुन थोडी बाचाबाची झाली. त्यांनी म्हटले की, बीडची बदनामी करु नका. बीडची बदनामी कोण करत आहे? असा सवाल आम्ही केला. बीडची बदनामी कोण करत आहे, जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आम्ही जनते समोर आणत आहोत, असे मुद्दे बैठकीत आले असे खासदार सोनवणे म्हणाले. जिल्ह्यातील गैरप्रकारात कोणीही दोषी आढळल्यास कारवाई करणार असे अजित पवारांनी सांगितले आहे, असेही खासदार सोनवणे म्हणाले.
खासदार सोनवणे यांनी बीडमधील रेल्वे आणि विमानतळाचाही मुद्दा उपस्थित केला. खासदार सोनवणे म्हणाले, “बीड जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अनेक कामांना मान्यता देण्यात आल्या. सीईओंनी आराखड्यात नसणाऱ्या कामांना मान्यता दिल्या आहेत. बैठकीत रेल्वे संदर्भात प्रस्ताव मांडल्याचे सोनवणेंनी सांगितले. तसेच बीडच्या विमानतळासाठी प्रयत्न सुरु आहेत. मांजरसुंबा येथील जागा त्यासाठी सुचवली त्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे खासदार सोनवणे म्हणाले.
पंकजा मुंडे अजित पवारांच्या शेजारी
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र बैठक शांततेत झाल्याचे म्हटले आहे. बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. अजित पवारांसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांची रोखठोक भूमिका आवडली. मी देखील अशीच भूमिका घेते मात्र राजकारणात महिलांनी रोखठोक भूमिका घेतलेली बहुतेकांना आवडत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सुरेश धस यांनी 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर पालकमंत्र्यांनी त्यांना लेखी तक्रार देण्याची सूचना केल्याचेही मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पालकमंत्री अजित पवार यांच्या शेजारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची खुर्ची होती. यावरुनही बरीच चर्चा झाली. धनंजय मुंडे यांना येण्यास उशिर झाला. अजित पवारांनी मला तिथे बसण्याची विनंती केली, त्या खुर्चीसमोर मंत्री लिहिलेले होते. मी मंत्री असल्यामुळे तिथे बसले. शासकीय बैठकींचा प्रोटोकॉल असतो, त्याचेच पालन केले असे बैठक व्यवस्थेवर पंकजा मुंडे म्हणाल्या.