(Beed Guardian Minister Ajit Pawar) बीड – पालकमंत्री म्हणून अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पहिल्याच भेटीत त्यांनी जिल्ह्यातील पवनचक्की कंपनी मालकांकडून खंडणी प्रकरण, पिकविमा घोटाळा, रस्ते कामातील गैरकारभार, रिव्हॉल्व्हर झळकावणे, विकास काम करणाऱ्यांकडून खंडणी मागण्याचे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला. अजित पवारांनी सांगितले त्या पद्धतीने आता जिल्ह्यात काम होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना हवे होते, मात्र त्यांच्या काळात पालकमंत्रीपद भाड्याने देण्यात आले, असा आरोप होत होता. तर त्यांच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचाही आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसलाच पालकमंत्रीपद मिळाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्रीपद मिळाले. आता अजित पवारांनी बीड जिल्ह्यासाठीचा त्यांचा अजेंडाच आज पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्पष्ट केला.
पीकविमा घोटाळा होता कामा नये – अजित पवार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर अजित पवारांच्या पक्षाचे आमदार तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात पीकविम्याचा परळी पॅटर्न आहे, असे सांगत पीकविमा घोटाळ्यातही धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पीकविम्यात गैरकारभार झाल्याचे नुकतेच मान्य केले होते. तेव्हा आमदार धस यांनी पीकविमा घोटाळा 5000 कोटींचा असल्याचा आरोप केला. यावर अजित पवार यांनी आज पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले की, “पीकविमा घोटाळा झाला आहे, इथे नाही राज्यात झाला आहे. तो यापुढे होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे.”
पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितली तर…
संतोष देशमुख हत्याकांडाला पवनचक्की खंडणी प्रकरण जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्याचाही उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, “विकासाची कामे होत असताता कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करु नये. असे काही माझ्या कानावर आले तर ‘मकोका’ लावायला पण मी मागे पुढे पाहणार नाही. मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन. मला इकडचे पालकमंत्रीपद देत असताना देवेंद्रजींनाही सांगितले होते की, सगळ्यांनी चांगल्या कामाला साध दिली पाहिजे. त्यात मी अधिकारीही बघणार नाही. काही अधिकाऱ्यांना इथे बरीच वर्षे झाली आहेत. त्यातही दुरुस्ती करणार आहे.” असा इशारा त्यांनी कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनाही दिला. संतोष देशमुख हत्याकांड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
रस्ते बांधकाम कामे अडवणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
डीपीडीसी बैठकीच्या एक दिवस आधी भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी आणि अंबेजोगाई तालुक्यात 73 कोटी 36 लाख रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचा आरोप केला. धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात वाल्मिक कराड यांनी ही बिले उचल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचा उल्लेख न करता अजित पवार म्हणाले की विकास कामांमध्ये वेडेवाकडे मी खपवून घेणार नाही. रस्त्यांची कामे अडवली तर खबरदार, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे. पाच-दहा लाखांची कामे माझ्याकडे घेऊन यायची नाही, मंजूर झालेली कामे ही दर्जेदार असली पाहिजे. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अजित पवारांनी बीडमध्ये असे काही होत नाही, असे सांगत असे झाले तर मकोका लावायला कमी करणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात तीन ते चार वेळा मकोका कायद्याचा उल्लेख केला. त्यामुळे अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायद्याने काम करणाऱ्यांनाच संधी देणार असे संकेत त्यांनी दिले आहे. आता त्यांच्या सरळ रेषेत काम करण्याच्या पद्धतीने जिल्ह्यात कामे होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांकडून मुल्यशिक्षणाचे धडे; मकोका लावायला कमी करणार नाही, कार्यकर्त्यांना सज्जड दम