बीड – बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड मध्ये दाखल झाले आहेत. परळीचे आमदार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर बीडमध्ये अजित पवार गटाने पक्षाचे नवीन कार्यालय उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रथमच येथे आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित आहेत.
पालकमंत्री अजित पवारांचा पहिला बीड दौरा
बीड जिल्हा पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार प्रथमच बीड दौऱ्यावर आले आहेत. आज अजित पवार यांच्या अध्यक्षेतत जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक होणार आहे. बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देऊ नये, अजित पवारांनीच बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार प्रथमच बीडला आले आहेत. सकाळी सात वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार विजयसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बीडमध्ये अजित पवार गटाने पक्षाचे नवे कार्यालय उभे केले आहे. अजित पवार यांनी या नव्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. बीड जिल्ह्यातील पीकविमा घोटाळा, परळीतील औष्णिक वीज केंद्रातील राखेचा गैरकारभार, वाळू माफिया यांना आळा घालण्यासाठी अजित पवारांनीच बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत होती.
दुसरीकडे जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्हा देशाच्या नकाशावर आला आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. दुसरा आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होता. हत्येच्या गुन्ह्यात त्याला अटक झाल्यानंतर त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार प्रकाश सोळंके, महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यापासून विरोधकांकडून केली जात आहे. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंना अद्याप अभय दिले आहे. मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू आता पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : Santosh Deshmukh Murder : कृष्णा आंधळे नेपाळमध्ये गेला का? आमदार सुरेश धस काय म्हणाले