Homeक्राइमBeed Murder : संतोष देशमुख हत्याकांडातील सर्वात मोठी अपडेट; मकोकामधून वाल्मिक कराडला...

Beed Murder : संतोष देशमुख हत्याकांडातील सर्वात मोठी अपडेट; मकोकामधून वाल्मिक कराडला वगळले 

Subscribe

बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. आज धाराशिव येथे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा निघाला आहे. त्यातच या हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. सीआयडी आणि एसआयटी देशमुख हत्येचा तपास करत आहे, त्यांनी हत्येतील आठ आरोपींवर मकोका लावण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हत्येचा मास्टरमाईंड म्हटला जाणारा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मकोका कारवाईतून वगळण्यात आले आहे.

मस्साजोग परिसरातील अवादा एनर्जी कंपनीकडे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप आहे. या खंडणी प्रकरणातूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर 22 दिवसांनी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता. 31 डिसेंबर पासून वाल्मिक कराड कोठडीत आहे. मात्र अद्याप त्याच्यावर हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्याला एसआयटीने मकोका लावला नसल्याची माहिती आहे.

- Advertisement -

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींना आज एसआयटीने मकोका लावला आहे. संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका कायदा महाराष्ट्रात आणण्यात आला आहे. यामुळे तपास अधिकाऱ्यांना आता आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा वेळ मिळणार आहे. मकोका अंतर्गत आरोपींना जामीन मिळणे कठीण होणार असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

दोन दिवसांपूर्वी कुटुंबियांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी मुख्यमंत्र्यांना खंडणीपासून अपहरण आणि हत्ये पर्यंचा सर्व घटनाक्रम त्यांना सांगितला होता. या प्रकणातील आरोपी आणि आरोपींना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली होती.

- Advertisement -

आमदार सुरेश धस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. विरोधकांनीही ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहातच सर्व आरोपींवर मकोका लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हत्येचा सूत्रधार म्हटला जाणारा वाल्मिक कराड याला मकोकांतर्गच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे.

या आरोपींवर मकोका 

1) सुदर्शन घुले, 2) प्रतिक घुले, 3) सुधीर सांगळे, 4) विष्णू चाटे, 5) महेश केदार, 6) सिद्धार्थ सोनवणे, 7) जयराम चाटे 8) कृष्ण आंधळे या आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे दोघेही खंडणी प्रकरणातील आरोपी होते. या दोघांवर हत्येचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वाल्मिक कराडवर अजून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळेच त्याच्यावर मकोका लावण्यात आला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

santosh deshmukh
santosh deshmukh

302 अंतर्गत कारवाई करुन फासावर लटकवा – वैभवी देशमुख

खंडणी ते अपहरण आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर 302 अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर न्यायालयात खटला; सोने, जमीन-घर बळकावले, मारहाणीची तक्रार

Unmesh Khandale
Unmesh Khandale
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -