जालना – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. गुंडावर बोलणे यात कसला आला जातियवाद? असा थेट सवाल त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना केला आहे. न्याय मागणे म्हणजे जातियवाद नाही, असेही त्यांनी मंत्री मुंडे यांना सुनावले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झाले असताना मनोज जरांगे हे माध्यमांशी बोलत होते.
संतोष देशमुख – सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मोर्चा
संतोष देशमुख त्या प्रकरणाला 9 जानेवारी रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. हत्येतील एक आरोपी अजूनही जेरबंद झालेला नाही. तर हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटला जाणारा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल झालेला नाही. तसेच परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायसासाठी आज जालना येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देशमुख कुटुंबिय देखील सहभाघी झाले. शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे या देखील मोर्चात सहभागी झाल्या. मोर्चामध्ये काळे कपडे, काळे झेंडे घेऊन नागरिक सहभागी झाले. जालन्यातील आंबेडकरी विचारांच्या संघटनाही या मोर्चात सहभागी झाल्या आहे.
गुंडांच्या विरोधात बोलण्यात कसला जातियवाद?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे लातूर, पुणे येथील मोर्चातही सहभागी झाले होते. आज ते जालना येथील मोर्चातही सहभागी झाले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संतोष देशमुख यांच्या न्यायची मागणी केली, यात कोणता जातियवाद आहे. धनंजय मुंडे हे स्वतःच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात घडणाऱ्या घटनांचा जाब हा मंत्र्यांनाच विचारला जातो. प्रश्न मंत्र्यांनाच विचारला जातो, असे सांगत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, खरी जातीय तेढ धनंजय मुंडे यांनाच निर्माण करायचा प्रयत्न चालवला आहे. धनंजय मुंडेंकडून ओबीसींच पांघरुन घेतलं जात आहे. त्यांनी जातीचं पांघरून घेऊ नये. आम्ही गुंडावर बोलायचे नाही का? असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला.
धनंजय मुंडेंचे लय लफडे – मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे हे संतोष देशमुख प्रकरणी आक्रमक झाले आहेत. धनंजय देशमुख यांच्यावर थेट हल्लाबोल करत ते म्हणाले की, धनंजय मुंडेंचे लय लफडे आहे, परळीपासून मुंबईपर्यंत त्यांचे लफडे आहे. मला तोंड उघडायला लावू नका. धनंजय मुंडे हे
गुंड आणि लाभार्थी टोळ्या सांभाळत आहे. न्याय मागणं म्हणजे जातीयवाद नाही, अशी टीका त्यांनी मंत्री मुंडे यांच्यावर केली.
25 जानेवारीपासून आमरण उपोषण
मनोज जरांगे म्हणाले की, 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. तेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर सविस्तर बोलेन असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा : Pune Crime News : पुण्यात बीपीओ कंपनीत तरुणीवर धारदार चाकूने वार करणारा म्हणतो, मला तिला मारायचे नव्हते…