जालना – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मोर्चात सहभागी झाले मात्र त्यांनी मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर मंचावर बसणे टाळले आणि सभेत भाषण करण्यासही त्यांनी नकार दिला. जालना येथे सभा असताना जरांगे पाटील यांनी भाषण करण्याचे का टाळले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाली. यावर मनोज जरांगे यांनी स्वतः खुलासा केला आहे.
मनोज जरांगे पुण्यातील सभेलाही होते गैरहजर
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे लातूर, पुणे येथील मोर्चातही सहभागी झाले होते. आज ते जालना येथील मोर्चातही सहभागी झाले. पुण्यातील सभेतही मनोज जरांगे यांचे भाषण झाले नव्हते. पुण्यातील मोर्चात सहभागी झाल्यानंतर सभेला सुरुवात होण्यापूर्वी जरांगे यांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे ते तातडीने पुण्याहून जालन्याकडे रवाना झाले होते. त्यामुळे पुण्यातील सभेत त्यांचे भाषण होऊ शकले नाही. मात्र आज त्यांच्या आरक्षण आंदोलनाचे रणांगण असलेल्या जालना जिल्ह्यात सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा निघाला. येथील सभेत मनोज जरांगे भाषण करतील अशी उपस्थित नागरिकांना अपेक्षा होती. मात्र जरांगे पाटील यांनी मंचावर जाण्याचे टाळत भाषण करण्यासही नकार दिला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 9 जानेवारी रोजी एक महिना पूर्ण झाला. हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. तर हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटला जाणारा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल झालेला नाही. तसेच परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) जालना येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देशमुख कुटुंबिय, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे, जालनाचे खासदार विक्रम काळे, आंबेडकरी चळवळीतील सचिन खरात, दिपक केदार सहभागी झाले. मोर्चाचे सभेत रुपांतर झाले, त्या सभेत सर्वांची भाषणेही झाली. मात्र मनोज जरांगे ना मंचावर आले ना भाषण केले.
मनोज जरांगेनी जालना येथील सभेत भाषण का केले नाही ?
मनोज जरांगे यांनी भाषण का केले नाही, याबद्दल खुलासा केला. जरांगे पाटील म्हणाले की, माझी तब्यत दोन दिवसांपासून बरी नाही. आज छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी जाण्याचे निश्चित होते. आयोजकांनी मोर्चात सहभागी होण्याचा आग्रह केला, म्हणून मोतीबागेपासून मोर्चात सहभागी झालो. सभास्थळापर्यंत मी मोर्चात सहभागी होतो. मंचावर आलो नाही, कारण माझी तब्यत बरी नव्हती. म्हणून मी समाजासोबत खाली बसण्यालाच पसंती दिली. थोड्यावेळाने मी उभा राहिलो तर सर्वच लोक उभे राहिले, म्हणून मी परत खाली बसलो आणि सभा संपेपर्यंत तिथे थांबलो.
भाषण करण्याची मला हौस नाही. मी मराठा समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. तब्यत बरी नसल्यामुळे आज भाषण केला नसल्याचा खुलासा जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना केला.
हेही वाचा : Beed Murder : गुंडाबद्दल बोलण्यात कोणता जातियवाद? मनोज जरांगे धनंजय मुंडेंवर संतप्त; म्हणाले, तुमची लय लफडी…