Homeमहाराष्ट्रमराठवाडाSuresh Dhas : भरसभेत सुरेश धसांनी टाकला बॉम्ब; गुजरात ड्रग्ज तस्करांसोबत धनंजय...

Suresh Dhas : भरसभेत सुरेश धसांनी टाकला बॉम्ब; गुजरात ड्रग्ज तस्करांसोबत धनंजय मुंडेंचे फोटो

Subscribe

धाराशिव – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथे निषेध मोर्चा निघाला आहे. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. धनंजय मुंडे यांचा काही लोकांसोबतचा एक फोटो झळकावत सुरेश धस म्हणाले की, गुजरातमध्ये ड्रग्स पकडण्यात आले. गुजरातमधील या ड्रग्ज तस्करांसोबत महाराष्ट्रातील लोक होते. त्या ड्रग्ज तस्करांसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत. सुरेश धस यांनी पुणे, पैठण येथील मोर्चानंतर आता धाराशिव येथील मोर्चातही अजित पवारांना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा अशी विनवणी करत जिजामातेच्या गावातील आमदार मनोज कायंदे यांना मंत्री करण्याचे आवाहन केले.

सुरेश धस धनंजय मुंडे यांच्याबद्दल पुन्हा आक्रमक झाले. धाराशिव येथील जनआक्रोश सभेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नवे आरोप केले. त्यांनी धनंजय मुंडे यांचे काही फोटो भरसभेत झळकावले आणि म्हटले की, “पाकिस्तानातून ड्रग्जची तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 176 किलो ड्रग्स पकडलं. 8 महिन्यापूर्वीची बातमी आहे. महाराष्ट्रातील तीन जणांसह पाच जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसांत 890 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्ज म्हणजे इंजेक्शन. 890 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात कैलास सानप आणि दत्ता आंधळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या एक का दीड वर्षांपासून हे आरोपी अटकेत आहेत. त्यांचा धनंजय मुंडेसोबत फोटो आहे. आका. मेन आका. सगळे आहेत. आता करा खुलासे आणि द्या आम्हाला शिव्या, असं सुरेश धस म्हणाले.

- Advertisement -

आमदार धसांची दादांना धाराशिवमधून विनवणी

मंत्री पंकजा मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी नुकताच धनंजय देशमुख यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. त्याचा उल्लेख करत आमदार सुरेश धस म्हणाले की, सारंगी महाजनांनी काय चूक केली? सारंगी महाजन यांचं ऐका. त्यांचा नवरा कसाही असेल. पण सारंगी महाजन यांचं तरी ऐका. तरीही दादा म्हणतात दुरान्वयेही संबंध नाही. दादा तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहे. दादा तुम्हाला सांगतो. त्याला मंत्रिमंडळातून काढा. याने भर दुपारी माणसं मारली. याला वाचवलं तर तो दिवसाच मारेल. त्याला मंत्रिमंडळातून काढा दादा. मुंडेंच्या जागी जिजामातेच्या गावातील – सिंदखेडराजा येथील आमदार मनोज कायंदेला मंत्रिमंडळात संधी द्या. वालू काकाच्या मागे कोण आहे ते पाहा, असे विनवणीच्या स्वरात आमदार धस म्हणाले.

सात नाही आठ जणांवार मकोका लागला पाहिजे… 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात जणांवर एसआयटी आता मकोका कायद्याने कारवाई करणार आहे. आज सात आरोपींना मकोका लाववण्यात आला आहे. मात्र हत्येचा मास्टरमाईंड म्हटला जाणार वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. याचा उल्लेख करुन आमदार धस म्हणाले, सात जणांवार मकोका लावण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला. पण सात नाही तर आठ जणांवर मकोका लागला पाहिजे, असे म्हणत त्यांनी वाल्मिक कराडवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

वाल्मिक कराडचा प्रताप, दहा लाख खर्च आणि उचल 5 कोटींची

वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप सुरेश धसांनी धाराशिव येथील मोर्चात उघड केला. बीडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या महासंस्कृती कार्यक्रमाचा घोटाळा त्यांनी समोर आणला. आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मिक कराडने परळीमध्ये मागील वर्षी महासंस्कृती कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचा सगळा खर्च 10 लाख रुपये झाला होता. आज जिल्हाधिकाऱ्यांकडून समजलं की या कार्यक्रमासाठी सरकारच्या तिजोरीतून 5 कोटी रुपये काढण्यात आले. 4 कोटी 90 लाख रुपये याने लाटले. याला का ईडीची नोटीस येणार नाही, असे म्हणत त्यांनी ईडीची नोटीसही भरसभेत झळकावली.

महासंस्कृती कार्यक्रमाचं कंत्राट एका व्यक्तीला मिळाले होते, वाल्मिक कराडने ते मिनाज फारुखी नावाच्या व्यक्तीला दिले. त्या मिनाज हा परभणी जिल्ह्यातील आहे, त्याचेही अकाऊंट चेक केले पाहिजे, अशी मागणी आमदार धसांनी केली.

ओबीसी नेत्यांना धसांच्या कानपिचक्या

आमदार सुरेश धस यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. लक्ष्मण हाके यांनी कोणाचीही उचल घेऊन माझ्यावर बोलू नये, अशी टीका त्यांनी केली. तर प्रकाश शेंडगे यांनी म्हटले होते की, ओबीसी धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. त्यावर आमदार धस म्हणाले, या मार्चात कोण सहभागी झाले आहे? येथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मारकऱ्यांची कोणतीच जात – धर्म नसतो तर ती वृत्ती असते, अशा कानपिचक्या त्यांनी ओबीसी नेत्यांना दिल्या.

 

हेही वाचा : Beed Murder Case : संतोष देशमुख यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे; फाशीशिवाय दुसरी शिक्षा नको – ओमराजे निंबाळकर

Unmesh Khandale
Unmesh Khandale
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -