Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समिती हरली म्हणून पेढे वाटणं हे १०५ हुतात्म्यांचं दुर्दैवं; राऊतांची...

महाराष्ट्र एकीकरण समिती हरली म्हणून पेढे वाटणं हे १०५ हुतात्म्यांचं दुर्दैवं; राऊतांची भाजपवर टीका

Related Story

- Advertisement -

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचं निवडणुकीत पानीपत झालं. दरम्यान, महाराष्ट्रात भाजपने पेढे वाटल्याने शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हरली म्हणून पेढे वाटणं हे १०५ हुतात्म्यांचं दुर्दैवं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना बेळगाव निवडणुकीवर भाष्य केलं. “महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमाबांधवांची प्रातिनिधीक संघटना म्हणून त्यांना मदत करत आलो. बेळगावात शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे कोणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले नाही. अपवाद फक्त आमचे जुने मित्र भाजप. काल महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त केला, पेढे वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांनी याबद्दल पेढे वाटावेत हे खरं म्हणजे आमच्या १०५ हुतात्म्यांचं दुर्दैव आहे,” असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

“बेळगावातील ज्या लोकांनी ६० वर्षे हा लढा जीवंत ठेवला, दुर्दैवाने त्यांचा पराभव घडवून आणला. त्या पराभवाची कारणं समजून घेतली पाहिजेत. कशा प्रकारे कर्नाटक सरकारने मराठी लोकांमध्ये फाटफूट घडवून आणली. कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केली. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जे आक्षेप घेतले होते ते फेटाळून लावण्यात आले. ८ वर्ष तेथे प्रशासक नेमल्यानंतर अचानक निवडणूक जाहीर झाली, प्रचाराला वेळ दिला नाही. यावरुन हा पराभव दुर्दैवी असलं तरी कर्नाटक सरकार मराठी लोकांचा आवाज कसा दडपतंय हे पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. तरी आमची लोकं संघर्ष करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात त्यांचं कौतुक असायला पाहिजे, पेढे कसले वाटता,” असा घणाघात राऊत यांनी केला.

“जे छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबाने अटक केल्यावर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता, तरी इथल्या काही लोकांना आनंद झाला होता , तशाच प्रकारचा आनंद मला यांच्या चेहऱ्यावर दिसतो,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी भाजपवर केली.

बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता

- Advertisement -

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने ३६ जागा मिळवत बहुमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे राऊतांनी बोलून दाखवलेले स्वप्न मात्र भंगले.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला ३६ जागा मिळाल्या आहेत तर महाराष्ट्र एकीकरण समिती-२, काँग्रेसला ९ आणि इतरांना बेळगाव महापालिकेच्या एकण ५८ जागांपैकी ११ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास होता. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हावे अशी आशा आम्ही करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण राऊत यांचा दावा फोल ठरवत भाजपने बेळगाव महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.

 

- Advertisement -