मुंबई : कुर्ला येथे सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला तर 42 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटल्यानंतर आणि भाडे तत्वावरील बसचालक वाईन शॉपमधून मद्याच्या बाटल्या खरेदी करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने बेस्ट प्रशासनााला जाग आली आहे. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि बस चालकांकडून होणारे अपघात टाळण्यासाठी आता भाडे तत्वावरील बस चालविणाऱ्या कंत्राटी चालकांची सरप्राईज ब्रिदींग टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. (BEST bus drivers to undergo surprise breathing test.)
हेही वाचा : BEST : बेस्टला वाचविण्यासाठी सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन करू; बेस्ट कामगार सेनेचा इशारा
बेस्ट उपक्रमात काम करणाऱ्या अधिकृत बस चालक आणि वाहक यांना कडक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र भाडे तत्वावरील बसगाड्यांवर कार्यरत बस चालक व वाहक यांना असे कडक नियम लागू नाहीत. त्यामुळे भाडे तत्वावरील बस चालक हे ऑन ड्युटी असताना चक्क वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून ते प्राशन करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाडे तत्वावरील बस गाड्यांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्याची गंभीर दखल घेत बेस्ट उपक्रमाने भाडे तत्वावरील बसचालक आणि वाहक यांना कडक नियम लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाडे तत्वावरील बस चालकाने, वाहकाने मद्य सेवन केले आहे की नाही, याबाबत त्यांची सरप्राईज ब्रिदींग टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यामुळे चालकाने मद्यपान केले आहे का, ते तपासणीतून समजणार आहे.
हेही वाचा : Karnak Pool : कर्नाक पुलावर पुढील महिन्यात बसणार दुसरा गर्डर; वाहतूक कधीपासून? जाणून घ्या…
बेस्ट उपक्रमातील बसचालक हे ऑनड्युटी मद्य खरेदी करीत असल्याचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बेस्टची प्रतिमा मलिन होत आहे. नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत बेस्ट प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील संबंधित तीन बस चालकाचे निलंबन करण्यात आले आहे. असे प्रकार पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश सर्व बस चालकांना देण्यात आले आहे. बेस्टमधील भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरची ब्रिदिंग अॅनालायझर टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये आगारातून बस प्रवासासाठी निघताना किंवा कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल. यासाठी अधिकार्यांची टीम तैनात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar