मुंबईकरांचा प्रवास गारेगार, बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसगाड्या

मुंबई : एकीकडे पूर्व आणि पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केलेली असतानाच मुंबईकरांना माफक दरात चांगली सार्वजनिक बस सेवा देणाऱ्या बेस्ट परिवहन विभागामार्फत लवकरच नवीन डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस आणि प्रीमियम एसी बसगाड्या उद्या ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि सुखकर होणार आहे.

या नवीन बसगाड्यांचे लोकार्पण गुरुवारी सायंकाळी टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री (रस्ते व वाहतूक महामार्ग) नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. तसेच, पालिका आयुक्त इकबाल चहल व बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र हे उपस्थित राहतील.

आत्तापर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त डिझेलवर चालणाऱ्या डबलडेकर बस होत्या, पण मुंबईकरांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबलडेकर बस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. आता इलेक्ट्रीक बसच्या पर्यायामुळे इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने प्रवासी क्षमतावाढ सुद्धा शक्य होणार आहे. डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बस गाड्यांची सुविधा देशात प्रथमच मुंबईत उपलब्ध होणार आहे. तर, बेस्टच्या नवीन प्रीमियम एसी बसगाड्यांसाठी प्रवाशांना बेस्टच्या चलो अॅपचा वापर करून ऑनलाइन तिकीट बुकिंग व आरक्षण करता येणार आहे.

एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकिटांचे दर कमी केल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद लक्षात घेता पश्चिम रेल्वेने 8 ऑगस्टपासून एसी लोकलच्या आठ अतिरिक्त फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. तर, मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकलच्या 10 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ठाणे-सीएसएमटी-ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. बहुतांश फेऱ्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या चालवण्यात येणार आहेत.