घरCORONA UPDATEBEST पोशिंदा; स्वतःच्या शेतातील धान्य देतो गोरगरिबांना

BEST पोशिंदा; स्वतःच्या शेतातील धान्य देतो गोरगरिबांना

Subscribe

एकीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. तर दुसरीकडे या संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत बेस्टचे चालक स्वतःचा ८ एकर शेतातील धान्य आणि स्वतःच्या पैशाने किरणा विकत घेऊन, गावातील गोरगरीब कुटुंबियांना रेशन वितरित करत आहेत. या कामासाठी त्यांच्या कुटुंबियांचा मौलाचा वाटा आहे. त्यांच्या या कामाची दखल तहसीलदार यांनी घेतली असून त्यांचे आभार मानून कौतुक केले आहे.

अहमदनगर जिल्हातील चांडगावमधील नेमीचंद मफाजी खामकर गेल्या २३ वर्षांपासून बेस्ट वाहतूक विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. बेस्टमध्ये नोकरी करत असताना शेती सुद्धा करायचे. शेती कसण्याची संपुर्ण जबाबदारी पत्नी व मुलांना दिली आहे. २३ मार्च पूर्वी ते गावाकडे शेती कामासाठी गेले होते. मात्र त्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू झाला. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी त्यांना कर्तव्यावर जाता आले नाही. मात्र बेस्टमध्ये सेवा देता आली नसली तरी त्यांनी गावात राहून गोरगरिबांना मदतीसाठी हात पुढे केला आहे.

- Advertisement -

मार्च महिन्यापासून आपल्या देशावर आलेले अस्मानी संकट नेमीचंद यांनी जाणले. त्यांच्या चांडगावमध्ये दोन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असून त्यामध्ये अनेक कुटुंबिय गोरगरीब आहेत. त्यांनी आपल्या गावातील गोरगरिबांची चौकशी केली. त्यानंतर गावातील गोरगरिबांचा घरांमध्ये गहू, बाजरी, कुळीथ, हरभरा या धान्याची मदत दिली. महत्वाचे म्हणजे हे धान्य त्यांनी स्वतःच्या जमिनीत पेरलेले आहे. तर साबण, चहा पावडर, साखर, मसाला वगैरे वस्तू त्यांनी दुकानातून विकत आणून पुरवल्या आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे. खामकर कुटुंबियांच्या या कामामुळे गावातील सहकारी सुद्धा सहभाग घेत आहे.

अशी करत आहेत मदत

नेमीचंद यांनी गावातील गरजू नागरिकांसाठी रेशन किट तयार केले आहे. ज्यामध्ये अडीच किलो गहू, बाजरी २ किलो, हरभरा १ किलो, कुळीथ १ किलो आणि एक पाकीट मसाला अशा महत्त्वाच्या वस्तू दिल्या आहेत. हे रेशन किट तब्बल दीड आठवडा चालते. खामकर बेस्टच्या दिंडोशी आगारमध्ये चालक म्हणून सेवा देत आहेत.

- Advertisement -

 

लॉकडाऊनमुळे मी माझ्या कर्तव्यावर जाऊ शकलो नाही. मात्र गावात असताना गोरगरिबांची परिस्थिती पाहता आली नाही. त्यामुळे या संकटकाळात मी आणि माझ्या कुटुंबियांनी निर्णय घेतला की, गावांतील गरजूंना मदत करायची. त्यामुळे आम्ही स्वतःच्या शेतातील धान्य आणि किराणा विकत घेऊन गरजू लोकांना वितरीत करतो आहोत. – नेमीचंद मफाजी खामकर, बेस्ट चालक
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -