मुंबई : बेस्ट परिवहन आणि विद्युत विभागाचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेला अंदाजित अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे आज, (28 नोव्हेंबर) सादर केला, मात्र या अर्थसंकल्पात नेमके काय दडले आहे, उत्पन्न किती, खर्च किती, कर्जाचा बोजा किती, निवृत्त कर्मचारी यांची थकीत देणी किती, ती देणी कधी व कशी काय देणार, कोट्यवधी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्याबाबत काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, याबाबत कोणतीही माहिती देण्यास बेस्ट उपक्रमाने स्पष्ट नकार दिला. दरम्यान, मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या या अर्थसंकल्पीय सादरीकरणाप्रसंगी महापालिका सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, महापालिका सचिव रसिका देसाई, ‘बेस्ट’ चे अधिकारी उपस्थित होते. (BEST Transport and Electricity Department presents budget for the financial year 2025-26)
बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. बेस्टचा 2024-25 चा 2,523.94 कोटींचा अर्थसंकल्प त्यावेळी बेस्ट महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी, तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सादर केला होता. त्यामध्ये, बेस्टने संचित तूट, कर्ज आणि निवृत्त कर्मचार्यांची थकीत देणी यासाठी मुंबई महापालिकेकडे तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही बेस्ट उपक्रमाने कोट्यवधी रुपयांची तूट दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक मदतीची अपेक्षा केल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात बेस्टला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी बेस्ट उपक्रमाला 800 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची तजवीज करण्यात आलेली आहे, मात्र एवढ्याशा निधीने बेस्ट उपक्रमाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – New Government : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपदाला नकार! श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
बेस्ट उपक्रमाला उत्पन्न वाढविण्यासाठी तिकीट दरात म्हणजे भाडे वाढ करावी लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, तर दुसरीकडे पर्यावरण अनुकूल इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यावर भर देणार आहे, मात्र त्यासाठी मुंबई महापालिका अथवा राज्य शासन अथवा केंद्र शासन यांच्याकडून भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अर्थसंकल्पाबाबत गोपनीयता का?
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता 25 नोव्हेंबरला संपली. त्यानंतर आज बेस्ट उपक्रमाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला, मात्र या अर्थसंकल्पात नेमके काय आहे, त्याबाबतची माहिती देण्यास बेस्ट उपक्रमाने नकार दिला आहे. शुक्रवारी आवश्यक माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले, मात्र या अर्थसंकल्पात एवढ्या कोणत्या गोपनीय बाबी दडल्या आहेत की त्याबाबतची माहिती, आकडेवारी प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करण्यात येत नाही, याबाबत पालिका व बेस्ट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – Cold Weather : येत्या तीन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा; सर्वाधिक तापमान कुठे?