घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र बंद मुंबईत तुरळक

महाराष्ट्र बंद मुंबईत तुरळक

Subscribe

बेस्टच्या बसेस फोडल्या

नागरिकता दुरुस्ती कायदा आणि नागरीक नोंदणी कायद्याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई आणि ठाण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईतील चेंबूर, रमाबाईनगर, कुर्ला, वरळी येथे काहीप्रमाणात बंद होता. मात्र मुंबईत इतरत्र बंदचा परिणाम जाणून आला नाही. या बंदला हिंसक वळण लागताना मुंबईत बेस्टच्या तीन गाड्या आंदोलकांकडून फोडण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी ४ वाजता बंद मागे घेत असल्याची घोषणा करताना बंद यशस्वी झाल्याचे सांगितले. तसेच बेस्टच्या बसेस् फोडणारे वंचित आघाडीचे कार्यकर्तेच नव्हते असा दावाही त्यांनी केला.

कुर्ला रेल्वे स्थानकावरून चेंबूरकडे जाणार्‍या 362 क्रमांकाच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. आंबेडकर गार्डन चेंबूरकडे जात असताना उमर्शिबाप्पा चौक येथे काही आंदोलकांनी ही बस थांबवली आणि तिच्यावर दगडफेक केली. दगडफेकीत चालक किरकोळ जखमी झाला. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर आंदोलकांनी मोर्चा काढत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगर आणि सायन येथे रास्ता रोको करण्यात आला. पवईमध्ये देखील जोगेश्वरी-अंधेरी लिंक रोडवर आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. मुलुंड, विक्रोळी, सायन आणि घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरमध्ये दुकाने बंद करण्यात आली.

- Advertisement -

अकोल्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील शाळा, महाविद्यालय पूर्णपणे बंद होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीमार्ग आणि टिळक मार्गावरील दुकाने बंद होती. वंचितचे कार्यकर्ते शहरात फिरून बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन करत होते. बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बुलडाणा शहरात सकाळपासून व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. जिल्ह्यात जळगाव जामोद, नांदुरा शहरात चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.

इंदापूर व बारामतीतही बदंला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी बारामती व इंदापूरच्या बाजारपेठा बंद होत्या. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जालना, नंदुरबारमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहादा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला, तर नंदुरबारमध्ये अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत होते. मुस्लीम बहुल भागांमध्ये मात्र या बंदचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. या भागातील सर्व दुकाने बंद होती. जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे बंदचा चांगला परिणाम दिसून आला. बंद शांततेत पार पडावा यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

एसटीच्या 1हजार 441 फेर्‍या रद्द
महाराष्ट्र बंदमध्ये राज्याच्या लालपरीला शुक्रवारी पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. या बंदमुळे एसटी महामंडळाला तब्बल 1 हजार 441 नियोजित फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय काही समाजकंटकांनी बंदचा आडोसा घेत औरंगाबादमधील पैठण येथे व नांदेडमधील कंदार येथे एसटीची काच फोडल्याची माहिती महामंडळाने दिली.एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बंदमुळे जिल्हानिहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार १४४१ एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -