श्रीकांत शिंदेंकडून मारण्याची सुपारी; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात लढणारे संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरील आरोपासंदर्भातील पत्र मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. या पत्रामुळे ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला मला मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला, मात्र शिंदे गटाने हा आरोप फेटाळून लावत संजय राऊत यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचा टोला लगावला आहे.

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात लढणारे संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरील आरोपासंदर्भातील पत्र मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. या पत्रामुळे ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा हटवण्यात आली. लोकप्रतिनिधींना सुरक्षा देणे हा राज्य सरकारचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, पण एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, संजय राऊतांचा हा आरोप शिंदे गटाने फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांचे डोके फिरले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू. फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टीका करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे असे त्यांचे धोरण आहे. ठाकरे गटाच्या उरलेल्या मंडळींबद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार करायचे यासाठी ते असे उद्योग करीत आहेत, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

संजय राऊत आणि सुनील राऊत कायम गुंड टोळ्यांच्या संपर्कात असतात. मांडवली बादशाह असे त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलले जाते. ते सकाळी माध्यमांशी बोलतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभी असलेली माणसे पाहा. त्यांचा पूर्वेतिहास पाहा. पोलीस स्थानकात त्यांच्या असलेल्या नोंदी पाहा. त्यामुळे स्वत: काचेच्या घरात राहून दुसर्‍यावर दगड मारण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असा टोलाही म्हस्के यांनी लगावला.

संजय राऊत माझ्या इज्जतीची वाट लावत आहेत. न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे. मला गुंड बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? संजय राऊत कोणाबद्दल काहीही बोलू शकतात, पण तुमच्या राजकारणात सामान्य लोकांना का ओढता. माझी बायको वकील आहे. त्यामुळे आम्ही संजय राऊतांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहोत, अशा शब्दांत राजा ठाकूर यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी आहे की सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे याची चौकशी केली जाईल. संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत.

कधी २ हजार कोटींचा आरोप करतात, तर कधी सुरक्षा व्यवस्थेवरून ते सरकारवर चुकीच्या पद्धतीने आरोप करीत आहेत. कोणत्याही नेत्याला सुरक्षा देण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करीत नाहीत, तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमलेली असते. ती समिती त्या त्या नेत्याचे सर्वेक्षण करून सुरक्षेसंदर्भात निर्णय घेत असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरून राजकीय आरोप करणे चुकीचे आहे.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री