घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध पिताय का? 'एफडीए'कडून भेसळ करणार्‍या दूध संकलन केंद्राचा...

सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध पिताय का? ‘एफडीए’कडून भेसळ करणार्‍या दूध संकलन केंद्राचा पर्दाफाश

Subscribe

नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मनमाड शहरामधील दूध संकलन व शितकरण केद्रावर छापा टाकला. या छाप्यात पथकास बनावट दूध तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पथकाने दूध भेसळसाठी वापरले जाणारे व्हे पावडरचा आठ किलोचा साठा जप्त केला असून, मिक्स मिल्क दुधाचा ४ लाख ५६ हजार रुपयांचा १२ हजार लिटर साठा नष्ट केला आहे.

अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार मनमाड शहरात शुक्रवारी (दि.२८) अन्न व औषध प्रशासन विभागाने पथकाने मालेगाव चौफुली जवळील मे. आईसाहेब स्वयंसहायता बचतगट दूध संकलन व शितकरण केंद्र या पेढीवर छापा टाकला. या ठिकाणी दूध संकलन व शितकरणाचे कामकाज सुरु आढळून आले. तीन वेगवेगळया टँक बीएमसी असून, त्यामध्ये एकत्रित १२ हजार लिटर दूध हे संकलित करुन शितकरणसह साठविलेले आढळले. शेजारील गाळयाची पथकाने तपासणी केली असता एका विनालेबल खुल्या प्लॅस्टिक बॅगमध्ये अंदाजे १० किलो व्हे पावडर साठविलेले आढळून आले.

- Advertisement -

याठिकाणी साठविलेल्या दुधाच्या साठ्यात व्हे पावडरची भेसळ होत असल्याच्या संशयावरुन अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी तिन्ही बीएमसी टँकमधून तीन मिक्स मिल्क या दुधाचे नमुने विश्लेेषणासाठी घेतले. त्यानंतर व्हे पावडरचा साठा भेसळकारी पदार्थ म्हणून नमुना घेवून त्याचा उर्वरित एक हजार सहाशे रूपयांचा ८ किलोचा साठा जप्त केला. मिक्स मिल्क दुधाचा ४ लाख ५६ हजार रुपयांचा शिल्लक १२ हजार लिटर साठा हा नाशवंत असल्याने व व्हे पावडरची भेसळ केल्याच्या दाट संशयावरुन पंचासमक्ष ड्रेनेजमध्ये वाहून संपूर्णपणे नष्ट केला. पथकाने घेतलेले नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविले असून, अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच कायदयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उ.सि. लोहकरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे व वाहनचालक नि.खं. साबळे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -