घरमहाराष्ट्रसावधान! राज्यात स्वाईन फ्लू पसरतोय

सावधान! राज्यात स्वाईन फ्लू पसरतोय

Subscribe

राज्यात सध्या ८९२ स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. तर ८८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून त्यामध्ये नाशिक आणि पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

राज्यात स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी, राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची आज मंत्रालयामध्ये तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचं या बैठकीमध्ये समोर आलं. त्यामुळे ‘राज्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर २४ तासात ताप कमी न झाल्यास, तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळ्या द्याव्यात’, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. गेल्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. पुणे, नाशिक विभागात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार करावे ? याबाबत आरोग्य विभागाकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहे. त्याचा अवलंब खासगी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीदरम्यान केले.

स्वाईन फ्लू रुग्णांची सद्यस्थिती

राज्यात सध्या ८९२ स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. तर ८८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून त्यामध्ये नाशिक आणि पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. १ जानेवारी ते २५ सप्टेंबर या कालावधीत १५ लाख ६१ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २३ हजार ९०५ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. ८९२ बाधित रुग्णांपैकी रुग्णालयात ३३७ रुग्णांवर उपचार सुरु असून, ४६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात ४४ तर, नागपूर येथे ३ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. राज्यात नाशिक विभागात २६, पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात १८, अहमदनगर ८, पुणे मनपा क्षेत्रात ७, सातारा व ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी ६, सोलापूर ३, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव प्रत्येकी २, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, बुलढाणा आणि मीर भाईंदर येथे प्रत्येकी एक अशा एकूण ८७ रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर राज्यातील फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

त्वरित उपचार आवश्यक

स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव मध्यमवयीन व्यक्तींना अधिक जाणवत आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरसमध्ये बदल झाला नसून त्यावरील उपचारात होत असलेल्या विलंबामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा निष्कर्ष, डेथ ऑडिट समितीने काढला आहे. राज्यातील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी सर्दी, तापाच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर एका दिवसात लक्षणे कमी झाली नाहीत तर अशा रुग्णांवर तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळी द्यावी. यामध्ये हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्वच मेडिकल स्टोअर्समध्ये ऑसेलटॅमीवीरच्या गोळ्यांची उपलब्धता असण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  राज्यात १ लाख २८ हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून सर्व रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -